उसाच्या मापातील पापाला बसणार चाप; भरारी पथके तपासणार साखर कारखान्यांची वजनकाटे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2021 05:06 PM2021-12-22T17:06:50+5:302021-12-22T17:18:58+5:30

भरारी पथक स्वयंस्फुर्तीने कारखाना स्थळावर अचानक भेटी देवून वजन काट्यांची तपासणी करणार आहेत.

squads will check the weights bridges of sugar factories | उसाच्या मापातील पापाला बसणार चाप; भरारी पथके तपासणार साखर कारखान्यांची वजनकाटे

उसाच्या मापातील पापाला बसणार चाप; भरारी पथके तपासणार साखर कारखान्यांची वजनकाटे

googlenewsNext

पैठण : जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरु झालेला  असून उसाच्या मापात पाप होत असल्याच्या तक्रारी ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून सध्या केल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या आदेशानुसार  साखर कारखान्यांचे वजन काटे तपासणीसाठी भरारी पथकाची स्थापना करण्यात आली आहे. कारखान्याच्या वजन काट्या संदर्भात आक्षेप असल्यास शेतकऱ्यांनी भरारी पथकाकडे तक्रार करावी असे आवाहन करण्यात आले आहे. 

भरारी पथक स्वयंस्फुर्तीने कारखाना स्थळावर अचानक भेटी देवून वजन काट्यांची तपासणी करणार आहेत. शेतकऱ्यांना वजनाची पावती योग्य प्रकारे देण्यात येते किंवा कसे याची खात्री करणार आहे. एखाद्या साखर कारखान्यावर वजनाबाबत गैरप्रकार होत असल्याची तक्रार  प्राप्त झाल्यावर लगेच त्या ठिकाणी वजन काट्याची तपासणी करुन गैरप्रकार आढळल्यास यंत्रणेमार्फत योग्य ती कार्यवाही करण्यात येईल असे जिल्हाधिकारी चव्हाण यांनी सांगितले. औरंगाबाद जिल्ह्यातील संत एकनाथ सहकारी साखर कारखाना, पैठण. बारामती अँग्रो कन्नड, घ्रुष्णेश्वर सहकारी साखर कारखाना, खुलताबाद. रेणुकादेवी शरद सहकारी साखर कारखाना, विहामांडवा ता पैठण. मुक्तेश्वर शुगर लि. धामोरी ता गंगापूर. छत्रपती संभाजी राजे साखर कारखाना चितेपिंपळगाव ता औरंगाबाद. सिध्देश्वर सहकारी साखर कारखाना सिल्लोड या साखर कारखान्याचा गळीत हंगाम सुरू आहे. 

शेतकऱ्यांनी तक्रार करावी
यंदा सरासरी पेक्षा जास्त ऊस शेतकऱ्यांकडे असल्याने कारखाने ऊस घेऊन जातील का ? या विवंचनेत सध्या शेतकरी आहेत. कारखान्यावर उसाच्या वजन काट्यावर आक्षेप घेण्याचे धाडस शेतकरी करीत नाहीत यामुळे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी भरारी पथकाची स्थापना केली आहे. मापा संदर्भात आक्षेप असल्यास पथकाकडे तक्रार करावी असे आवाहन पथकाचे सदस्य चंद्रकांत झारगड यांनी केले आहे. 

भरारी पथके करणार तपासणी 
प्रत्येक साखर कारखान्यांवर वजनकाटय़ाजवळ २०-२० किलोची वजने असतात. मात्र शेतकरी कधीच काटा करताना त्या ठिकाणी जात नाही अथवा त्या वजनकाटय़ावर ती वजने ठेवून साखर कारखान्यातील काटय़ाची तपासणी करण्याचे धाडस दाखवत नाही. म्हणून भरारी पथकाने वेळोवेळी तपासणी करून अहवाल सादर करावा. तसेच तपासणी दरम्यान पथकातील शेतकरी प्रतिनिधी उपलब्ध न झाल्यास कारखान्यावर उपस्थित दोन शेतकऱ्यांना पथकात सहभागी करून घ्यावे असे आदेशात म्हटले आहे.

कारखाना निहाय भरारी पथक सदस्य...
- शरद सहकारी साखर कारखाना विहामांडवा ता. पैठण : 
तहसीलदार, सहायक पोलीस निरीक्षक ( पाचोड ) , वैध मापन निरीक्षक ( पैठण ), लेखापरीक्षक व शेतकरी प्रतिनिधी माऊली मुळे.
- संत एकनाथ सहकारी साखर कारखाना पैठण : 
तहसीलदार ( पैठण ) , पोलीस निरीक्षक ( पैठण ) , वैध मापन निरीक्षक ( पैठण ) , ए.जी. जाधव,लेखापरीक्षक व शेतकरी प्रतिनिधी चंद्रकांत झारगड.
- बारामती अँग्रो लिमिटेड, कन्नड : 
तहसीलदार कन्नड, पोलीस निरीक्षक कन्नड, वैधमापन निरीक्षक पैठण, लेखापरीक्षक, व शेतकरी प्रतिनिधी चंद्रकांत झारगड. 
- घ्रुष्णेश्वर साखर कारखाना, खुलताबाद : 
तहसीलदार खुलताबाद, पोलीस निरीक्षक खुलताबाद, वैधमापन निरीक्षक खुलताबाद, लेखापरीक्षक व शेतकरी प्रतिनिधी चंद्रशेखर साळुंके. 
- मुक्तेश्वर साखर कारखाना, गंगापूर : 
तहसीलदार गंगापूर, पोलीस निरीक्षक गंगापूर, वैधमापन निरीक्षक गंगापूर, लेखापरीक्षक व शेतकरी प्रतिनिधी शिवाजीराव साबळे. 
- छत्रपती संभाजी राजे कारखाना चितेपिंपळगाव : 
तहसीलदार औरंगाबाद, पोलीस निरीक्षक औरंगाबाद, वैधमापन निरीक्षक औरंगाबाद, लेखापरीक्षक व शेतकरी प्रतिनिधी आरेफ पठाण. 
- सिध्देश्वर साखर कारखाना, सिल्लोड : तहसीलदार सिल्लोड, पोलीस निरीक्षक सिल्लोड, वैधमापन निरीक्षक सिल्लोड, लेखापरीक्षक व शेतकरी प्रतिनिधी के जी साबळे.

Web Title: squads will check the weights bridges of sugar factories

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.