गेवराईत गटशिक्षणाधिकारी कार्यालयात भरविला वर्ग
By Admin | Published: July 15, 2017 12:39 AM2017-07-15T00:39:17+5:302017-07-15T00:40:59+5:30
गेवराई : तालुक्यातील खांडवी जवळील अंबुनाईक तांडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पाच वर्गांसाठी एकच वर्ग खोली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गेवराई : तालुक्यातील खांडवी जवळील अंबुनाईक तांडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पाच वर्गांसाठी एकच वर्ग खोली आहे. आणखी वर्ग खोल्या उपलब्ध करून द्याव्यात, या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी गटशिक्षणाधिकारी कार्यालयात शुक्रवारी दुपारी वर्ग भरविला.
अंबुनाईक तांडा येथे पहिली ते पाचवीपर्यंत शाळा आहे. यासाठी एकच वर्ग खोली असून ती मोडकळीस आलेली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. वाढीव वर्ग खोल्या मिळाव्यात, या मागणीसाठी शाळेतील विद्यार्थ्यांनी थेट गटशिक्षणाधिकारी कार्यालयात वर्ग भरविला होता. यावेळी आम्हाला वर्ग खोल्या मिळाल्याच पाहिजेत, अशा घोषणा देत विद्यार्थ्यांनी परिसर दणाणून सोडला.
मागण्यांचे निवेदन विस्तार अधिकारी मिलिंद तुरूकमारे यांना देण्यात आले. यासाठी तात्काळ शाळेची दुरुस्ती व तात्पुरती व्यवस्था करून लवकरच तीन खोल्याची व्यवस्था करून देऊ, असे आश्वासन पंचायत समितीचे उपसभापती भीष्माचार्य दाभाडे यांनी दिले.