श्री सिद्धेश्वर महाशिवरात्री यात्रेला उत्साहात प्रारंभ
By Admin | Published: February 25, 2017 12:30 AM2017-02-25T00:30:09+5:302017-02-25T00:32:35+5:30
लातूर : ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर व श्री रत्नेश्वर देवस्थानच्या ६४ व्या महाशिवरात्री यात्रा महोत्सवास गुरुवारी मध्यरात्रीपासून प्रारंभ झाला
लातूर : ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर व श्री रत्नेश्वर देवस्थानच्या ६४ व्या महाशिवरात्री यात्रा महोत्सवास गुरुवारी मध्यरात्रीपासून प्रारंभ झाला. गवळी समाजाच्या दुग्धाभिषेकाने यात्रेस उत्साहात प्रारंभ झाला. उपविभागीय अधिकारी रामेश्वर रोडगे यांच्या हस्ते ‘श्रीं’ची महापूजा व ध्वजारोहण करण्यात आले.
महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर ग्रामदैवताचे दर्शन घेण्यासाठी भाविक भक्तांनी मध्यरात्रीपासून मंदिरात मोठी गर्दी केली होती. २४ फेब्रुवारी ते १२ मार्च असे एकूण १७ दिवस यात्रा महोत्सव चालणार आहे. २३ फेब्रुवारी रोजी रात्री १२ वाजता तोफांची आतषबाजी व गवळी समाजाच्या महाभिषेकानंतर दर्शन सोहळ्यास प्रारंभ झाला. शुक्रवारी पहाटे ५ वाजेपर्यंत संत सावता माळी भजनी मंडळातर्फे पालखी मिरवणूक काढण्यात आली. श्री सिद्धेश्वर मंदिरात सकाळी ८ वाजता पुष्पाभिषेक व पुष्पवृष्टीचा कार्यक्रम झाला. त्यानंतर सकाळी ९ वाजता उपविभागीय अधिकारी रामेश्वर रोडगे यांच्या हस्ते महापूजा व ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी यात्रा महोत्सव समितीच्या वतीने स्वागत करण्यात आले. तहसीलदार संजय वारकड, महेश हिप्परगे, श्रावण उगिले, यात्रा महोत्सव समितीचे मार्गदर्शक विक्रम गोजमगुंडे, सचिव अशोक भोसले, सुरेंद्र पाठक, ज्ञानोबा कलमे, व्यंकटेश हालिंगे, सुरेश गोजमगुंडे, बच्चेसाहेब देशमुख, प्रदीप पाटील खंडापूरकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी श्री सिद्धेश्वर व श्री रत्नेश्वराच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली. भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून यात्रा महोत्सव समितीचे पदाधिकारी व स्वयंसेवक प्रयत्नशील आहेत. मागील दोन-तीन वर्षे दुष्काळ होता. आता वरुणराजाने केलेल्या कृपादृष्टीमुळे यात्रा महोत्सवाला उत्साहात सुरुवात झाली आहे. (प्रतिनिधी)