ssc exam शेवटच्या पेपरच्या काही तास आधी वडीलांचे निधन, मुलाने मन्न घट करून दिली परीक्षा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2022 07:20 PM2022-04-04T19:20:56+5:302022-04-04T19:23:15+5:30
पेपरला जाण्यापूर्वीच सोयप या नियतीच्या परीक्षेला सामोरे जावे लागले.
कन्नड ( औरंगाबाद ) : इयत्ता दहावीमध्ये असलेल्या सोयप पिंजारी याचा सामाजिकशास्त्र भाग २ चा पेपर होता. पेपरचे मानसिक दडपण असतानाच पेपर सुरु होण्यास काही तासाचा आधी सोयपच्या वडीलांचे निधन झाले. वडिलांचा मृतदेह दारात असताना परिक्षेला जावे तरी कसे? असा सवाल त्याच्या मनात घोळत होता. मात्र, एका पेपरच्या गैरहजरीने पूर्ण शैक्षणिक वर्ष वाया जाणार यामुळे सोयपने मन घट्ट करुन पेपर देण्याचा निर्णय घेतला. पेपर सुटल्यानंतर त्याने वडिलांवर अंत्यसंस्कार केले.
नियती कुणाबरोबर कसा खेळ खेळेल हे सांगता येत नाही. मात्र, अशा परस्थितीवरही मात करता आली तर सर्वकाही जिंकल्यात जमा आहे. हेच धाडस कर्मवीर काकासाहेब देशमुख माध्यमिक विद्यालय येथील सोयप पिंजारी याने दाखवले आहे. सोयपचे वडिल रशीद पिंजारी हे गादीघर मजूर होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. सोमवारी पहाटेच त्यांचे निधन झाले. याच दिवशी त्यांचा मुलगा सोयप याचा इयत्ता दहावी चा पेपर होता. मात्र,पेपरला जाण्यापूर्वीच सोयप या नियतीच्या परीक्षेला सामोरे जावे लागले. वडिलांचा मृतदेह दारात असताना त्याने परीक्षेला जाण्याचा निर्णय घेतला. पेपर सोडवत असतानाही सोयपच्या मनावर काय बेतले असेल याची कल्पनाही करता येणार नाही. पण त्याने मन घट्ट करुन सामाजिक शास्त्र भाग दोन विषयाचा पेपर दिला आणि दुपारनंतर वडिलांवर अंत्यसंस्कार केले.
मजूरीवरच होतो उदरनिर्वाह
सोयप पिंजारी याच्या कुटुंबातील सर्वजण हे गादी बनवण्याचे काम करतात.हाताला काम तर पोटाला भाकर अशी काही घराची परस्थिती.वडिल रशीद पिंजारी हे देखील मजुरी करीत होते. पण गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. ऐन सोयपच्या पेपर दिवशी त्यांचे निधन झाले. त्यामुळे सोयपची द्विधा मनस्थिती झाली होती पण त्याने आगोदर शिक्षणाला महत्व दिले.पेपर देऊनच त्याने अंत्यसंस्काराला हजेरी लावली.
परीक्षा केंद्र कर्मवीर काकासाहेब देशमुख विद्यालय
इयत्ता दहावीत शिक्षण घेत असलेला सोयपचे परीक्षा केंद्रही कर्मवीर काकासाहेब देशमुख विद्यालय होते. त्यामुळे पेपर देऊन त्याने घर जवळ केले. यानंतर कुटुंबियांनी व गावातील नागरिकांनी रशीद पिंजारी यांच्या अंत्यसंस्कार केले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी, दोन मुले असा परिवार आहे. नियतीच्या परीक्षेत तर सोयपने धाडस दाखवले मात्र,ज्या अवस्थेत त्याने विषयाचा पेपर दिला त्याचा निकाल काय हे पहावे लागणार आहे.