SSC Exam: गैरप्रकारातून मिळविलेल्या फुगवट्यापेक्षा विद्यार्थ्यांनो, प्रामाणिक मूल्यांकनाला सामोरे जा

By योगेश पायघन | Published: March 1, 2023 06:28 PM2023-03-01T18:28:35+5:302023-03-01T18:28:51+5:30

गैरप्रकारातून मिळविलेल्या फुगवट्यापेक्षा विद्यार्थ्यांनो, प्रामाणिक मूल्यांकनाला सामोरे जा...

SSC Exan: Students, face honest assessment rather than fake inflated... | SSC Exam: गैरप्रकारातून मिळविलेल्या फुगवट्यापेक्षा विद्यार्थ्यांनो, प्रामाणिक मूल्यांकनाला सामोरे जा

SSC Exam: गैरप्रकारातून मिळविलेल्या फुगवट्यापेक्षा विद्यार्थ्यांनो, प्रामाणिक मूल्यांकनाला सामोरे जा

googlenewsNext

छत्रपती संभाजीनगर :दहावीच्या गुणांमध्ये गैरमार्गाने मिळविलेला फुगवटा पुढील शैक्षणिक व आर्थिक नुकसान देणारा ठरेल, याची जाणीव विद्यार्थ्यांना करून द्या. विद्यार्थ्यांना प्रामाणिक मूल्यांकनाला सामोरे न्या, गैरमार्गापासून रोखा. निर्भय वातावरणात परीक्षा पार पाडण्याच्या सूचना माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विभागीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष, उपसंचालक अनिल साबळे यांनी केंद्रप्रमुखांना दिल्या आहेत. गुरुवारपासून विभागातील ६२९ केंद्रांवर १.८० लाख विद्यार्थी दहावी बोर्डाची परीक्षा देणार आहेत. त्याच्या तयारीची लगबग शाळांसह, बोर्डात बुधवारी उशिरापर्यंत सुरू होती.

बोर्डाच्या दहावीच्या लेखी परीक्षेला गुरुवारपासून सुरुवात होत आहे. नांदेड पॅटर्ननुसार कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा पार पाडण्यासाठी केंद्रप्रमुखांना सूचना देण्यात आल्या आहेत. १० फेब्रुवारी ते १ मार्चपर्यंत प्रात्यक्षिक परीक्षा झाल्यानंतर सुरू होत असलेल्या लेखी परीक्षेत २,६१४ शाळांतील ९९ हजार ५४९ विद्यार्थी तसेच ८० हजार ६६१ विद्यार्थिनी असे एकूण १ लाख ८० हजार २१० परीक्षार्थी ६२९ परीक्षा केंद्रांवर परीक्षा देणार आहेत. गुरुवारपासून सुरू होणारी ही परीक्षा २५ मार्चपर्यंत असेल. या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांचे समुपदेशन, झडती आणि गैरप्रकारांना आळा घालण्याची जबाबदारी शाळा, परीक्षा केंद्रांवर देण्यात आली आहे. दहावीतील गुणांच्या फुगवट्याने पुढे होणाऱ्या दुष्परिणामांबद्दल जनजागृती करण्यावर भर देण्याच्या सूचनाही पर्यवेक्षकांना करण्यात आल्या आहेत.

जि. प. अधिकाऱ्यांसह महसूलच्या पथकांची नजर
काॅपीमुक्त आणि भयमुक्त वातावरणात परीक्षेसाठीची जय्यत तयारी विभागीय मंडळ आणि माध्यमिक शिक्षण विभागाकडून करण्यात आली आहे. त्यावर जिल्हा परिषदेच्या विभागप्रमुखांना संपर्कप्रमुख म्हणून नेमण्यात आले असून, जिल्हाधिकाऱ्यांच्या १० पथकांची नजर परीक्षेवर असणार आहे. परीक्षेच्या आधी एक तास व परीक्षेनंंतर एक तास सर्वच परीक्षा केंद्रांवर बैठे पथक नेमण्यात आले आहे. त्यामुळे यावर्षी गैरप्रकारांना आळा बसेल, असा विश्वास विभागीय सचिव विजय जोशी यांनी व्यक्त केला आहे.

...तर पर्यवेक्षक अन् केंद्रप्रमुखांवरही कारवाई
जिल्हाधिकाऱ्यांसह अधिकाऱ्यांची १० भरारी पथके, जिल्ह्यातील १७ संवेदनशील केंद्रांवर विशेष बैठे पथके, शिक्षण विभागाची ६ भरारी पथके तसेच महिलांची २ स्वतंत्र पथके नेमण्यात आली आहेत. परीक्षेत गैरप्रकार घडू नये, त्यासाठी विद्यार्थ्यांना समुपदेशन करणे, भयमुक्त वातावरणात परीक्षा पार पाडणे, झडती घेऊनच परीक्षार्थ्यांना प्रवेश आणि केंद्रावर गैरप्रकार झाल्यास पर्यवेक्षक आणि केंद्रप्रमुखांवर कारवाई प्रस्तावित करण्यात येईल, याची जाणीव सर्व केंद्रप्रमुखांना करून दिली आहे.
- एम. के. देशमुख, शिक्षणाधिकारी, माध्यमिक शिक्षण विभाग, औरंगाबाद

विभागीय मंडळातील जिल्हानिहाय आकडेवारी
जिल्हा - परीक्षा केंद्र - विद्यार्थी - विद्यार्थिनी - एकूण परीक्षार्थी
छत्रपती संभाजीनगर - २२७ - ३५३२९ - २९२६४ - ६४५९३
बीड - १५६ -२३७६४ - १७१५७ - ४१५२१
जालना - ९३ - १५२०३ - १२५९७ - २७८००
परभणी - १०० - १६९४३ - १३७४२ - ३०६७६
हिंगोली - ५३ - ८३१९ - ७३०१ - १५६२०

Web Title: SSC Exan: Students, face honest assessment rather than fake inflated...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.