SSC Result 2020: औरंगाबाद विभागात पुन्हा मुलींची बाजी; जालना जिल्हा ठरला अव्वल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2020 07:12 PM2020-07-29T19:12:08+5:302020-07-29T19:14:12+5:30
औरंगाबाद विभागाचा निकाल ९२ टक्के लागला आहे.
औरंगाबाद : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने मार्च-एप्रिलमध्ये घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल बुधवारी ( दि.२९ ) दुपारी ऑनलाइन जाहीर करण्यात आला. यामध्ये औरंगाबाद विभागाचा निकाल ९२ टक्के लागला आहे. विशेष म्हणजे यावर्षीही विभागातून मुलींनीच निकालात बाजी मारली आहे. राज्यात औरंगाबाद विभागाचा सर्वात कमी निकाल लागला आहे.
कोरोनामुळे सर्वच निकालांना उशीर झाला आहे. दरवर्षी जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होणार दहावीचा निकाल यावर्षी जुलैच्या शेवटी जाहीर झाला. औरंगाबाद विभागातून १ लाख ८५ हजार ९३५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १ लाख ८४ हजार ७६४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यातील १ लाख ६९ हजार ९९१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
निकालावर भूगोलच्या पेपरमुळे परिणाम
दहावीचा परीक्षा कालावधी ३ मार्च ते २३ मार्च असा होता. परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने शेवटचा पेपर भुगोल पेपर रद्द करण्यात आला होता. यामुळे भुगोल विषयांचं गुणदान कसं करायचं हा तिढा होता. अखेर मंडळाने निर्णय घेत बाकीच्या विषयांमध्ये मिळालेल्या गुणांची सरासरी काढून त्याचं भुगोल विषयाच्यागुणांमध्ये करण्यात येणार असल्याचं जाहीर केलं.
विभागात जालना जिल्ह्याची बाजी
औरंगाबाद विभागात जालना जिल्ह्याचा सर्वाधिक निकाला लागला आहे. जालना जिल्ह्याचा निकाल ९४.०४ टक्के लागला आहे. जिल्ह्यात एकूण ३२ हजार ३६१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी ३० हजार ४३३ मुले उत्तीर्ण झाली. औरंगाबाद ९२.१०, बीड ९१.२४, परभणी ९०.६६ तर हिंगोली जिल्ह्याचा निकाला ९१.९४ टक्के लागला आहे.
पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाईन अर्ज
उत्तरपत्रिकेच्या पुनर्मूल्यांकनासाठी उत्तरपत्रिकेची छायाप्रत अनिवार्य आहे. ही प्रत मिळाल्याच्या दिवसापासून कार्यालयीन कामाच्या पाच दिवसांत विहित शुल्क भरुन विभागीय मंडळाकडे ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. विद्यार्थ्यांना गुणपडताळणीसाठी ३० जुलै ते ८ ऑगस्ट या कालावधीत तर छायांकितप्रतीसाठी ३० जुलै ते १८ ऑगस्टपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहेत.