पेपर सुरू होण्याच्या आदल्या दिवशी वडिलांचे निधन;सर्वांत मोठ्या संकटातही मिळवले ८८ टक्के
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2024 11:29 AM2024-05-28T11:29:16+5:302024-05-28T11:29:57+5:30
SSC Result 2024: आयुष्यातील सर्वात मोठ्या संकटाला आर्या मोठ्या धिराने सामोरी गेली
छत्रपती संभाजीनगर : दहावीच्या परीक्षेला २ मार्च रोजी सुरुवात होणार होती. त्याच्या आदल्या दिवशी वडिलांचे निधन झाले. दुसऱ्याच दिवशी मुलीचा पेपर होता. आभाळाएवढे दु:ख झालेले असतानाही धैर्याने आर्या नितीन मुळे हिने दहावीची परीक्षा दिली. विभागीय मंडळाने जाहीर केलेल्या निकालात तिला तब्बल ८८.८० टक्के गुण मिळाले आहेत. ती एसबीओए शाळेतील विद्यार्थिनी आहे. तिचे आई-वडील खाजगी रुग्णालयात नोकरी करीत होते. त्यात वडिलांचे निधन झाले. आर्याने सर्व संकटाचा सामना करीत यश मिळवले. याबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.
विभागीय शिक्षण मंडळाने दहावीच्या परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर केला. त्यामध्ये विभागात छत्रपती संभाजीनगर जिल्हा हा दुसरा आला आहे. बीड जिल्ह्याने प्रथम स्थान पटकावले. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सिल्लोड तालुक्याचा सर्वाधिक ९७.७४ टक्के एवढा निकाल लागला. सर्वांत कमी खुलताबाद तालुक्याचा निकाल ९३.९६ टक्के लागला. जिल्ह्याचा निकाल ९५.५१ टक्के लागलेला असतानाच मागील वर्षी हाच निकाल ९३.५८ टक्के होता. त्यामुळे मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी निकालाचा टक्का वाढला.
दहावीच्या निकालामध्ये शाळांनी राखली यशाची परंपरा कायम
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मार्च महिन्यात घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. या निकालामध्ये शहरातील नामांकित शाळांनी यशस्वी निकालाची परंपरा कायम राखली आहे. बहुतांश शाळांनी १०० टक्के निकाल लावण्यात यश मिळाले आहे. तर अनेक शाळांचा निकाल ९० टक्क्यांहून अधिक लागला आहे.