'सैन्यात जाऊन भावाचे स्वप्न साकारणार';दहावीत ३५ टक्के मिळवणाऱ्या लढवय्या अश्विनीची जिद्द
By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2022 12:23 PM2022-06-18T12:23:20+5:302022-06-18T12:24:29+5:30
कमी गुण मिळूनही अश्विनीचा शिक्षणातील उत्साह कमी झालेला नसून तिला शिकून पुढे जायचे आहे.
चापानेर (औरंगाबाद) : शुक्रवारी दहावीचा निकाल जाहीर झाला. यात अनेक विद्यार्थी चांगल्या श्रेणीत उत्तीर्ण झाले. मात्र चापानेर येथील चंपावती कन्या विद्यालयाची विद्यार्थिनी अश्विनी अप्पासाहेब शेलार हिने केलेल्या रेकॉर्डची सगळीकडे चर्चा सुरू आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे अश्विनीला सर्वच विषयात प्रत्येकी ३५ गुण मिळाले आहेत. सोशल मीडियावरही हा विषय चर्चेत आहे.
अश्विनी शेलार ही चापानेर येथील चंपावती कन्या विद्यालयाची विद्यार्थिनी आहे. तिचे वडील आचारी काम करतात. अश्विनीने दहावीत असताना मन लावून अभ्यास केला. मात्र चांगल्या श्रेणीत उत्तीर्ण होण्याचे तिचे स्वप्न पूर्ण झाले नाही. अचंबित करणारी गोष्ट म्हणजे अश्विनीला मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित, सामान्य विज्ञान, सामाजिक विज्ञान या सर्व विषयांत ना कमी ना जादा प्रत्येकी ३५ गुण मिळाले आहेत. एकूण ५०० गुणांपैकी ती १७५ गुण मिळवून काठावर पास झाली आहे. मात्र तरीही अश्विनीच्या नावावर सर्वच विषयांत समान गुण मिळाल्याने रेकॉर्ड तयार झाला आहे. कमी गुण मिळूनही अश्विनीचा शिक्षणातील उत्साह कमी झालेला नसून तिला शिकून पुढे जायचे आहे. चंपावती विद्यालयाचा निकाल ९३.८२ टक्के लागला असून ८१ पैकी ७६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यात प्रथम क्रमांक पायल सुनील चुंगडे(९२ टक्के), द्वितीय क्रमांक संचिता नारायण पवार(८८.०८) तर तृतीय क्रमांक साक्षी साहेबराव घुले (८७.०६) हिचा आला.
लष्करात जाऊन भावाचे स्वप्न पूर्ण करायचे
अश्विनीचे वडील आचारी काम करतात. घरची परिस्थिती जेमतेम आहे. अश्विनीला तीन बहिणी व एक भाऊ आहे. तर मागील वर्षी अकरावीत शिकणारा एक भाऊ धरणात बुडून मरण पावला. त्याला भारतीय लष्करात जायचे होते, त्यानुषंगाने तो तयारीही करीत होता, मात्र नियतीने त्याला हिरावून नेले. आता त्याचे स्वप्न मला पूर्ण करायचे असून लष्करात जायचे असल्याचे अश्विनीने लोकमतशी बोलताना सांगितले.