SSC Result: दहावी परीक्षेत पुन्हा एकदा मुलींचाच डंका; विभागाचा ९३.२३ टक्के निकाल
By विजय सरवदे | Published: June 2, 2023 04:04 PM2023-06-02T16:04:01+5:302023-06-02T16:04:46+5:30
पाच जिल्ह्यांतील ६२९ परीक्षा केंद्रांवर १ लाख ७६ हजार ८४६ नियमित विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी १ लाख ६४ हजार ८८५ विद्यार्थी उत्तिर्ण झाले
छत्रपती संभाजीनगर : राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या औरंगाबाद विभागीय मंडळाने घेतलेल्या दहावी परीक्षेत ९३.२३ टक्के विद्यार्थी उत्तिर्ण झाले आहेत. विभागातील पाच जिल्ह्यांच्या तुलनेत बीड जिल्ह्याने निकालामध्ये आघाडी घेतली आहे, तर हिंगोली सर्वात मागे राहिला. औरंगाबाद जिल्हा दुसऱ्या क्रमांवर स्थिरावला आहे. विशेष म्हणजे, याहीवेळी निकालात मुलींचाच डंका राहिला आहे.
यासंदर्भात विभागीय मंडळाचे सचिव विजय जोशी, सहसचिव प्रियाराणी पाटील, सदस्य तथा शिक्षणाधिकारी एम.के. देशमुख यांनी पत्रकार परिषदेत हा निकाल जाहिर केला. यंदा औरंगाबाद विभागीय मंडळामार्फत २ ते २५ मार्च २०२३ या कालावधीत दहावीच्या परीक्षा घेण्यात आल्या. शुक्रवारी या परीक्षेचा निकाल ऑनलाइन पद्धतीने जाहीर करण्यात आला. विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणपत्रिका मात्र, १४ जून रोजी मिळणार आहेत. पाच जिल्ह्यांतील ६२९ परीक्षा केंद्रांवर १ लाख ७६ हजार ८४६ नियमित विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी १ लाख ६४ हजार ८८५ विद्यार्थी उत्तिर्ण झाले, तर २ हजार ५८४ पुनर्परीक्षार्थींपैकी १२३० विद्यार्थी उत्तिर्ण झाले. या निकालात विभागीय शिक्षण मंडळाच्या कार्यक्षेत्रातील औरंगाबाद जिल्ह्याचा निकाल ९३.५८ टक्के, बीड- ९६.२४ टक्के, परभणी- ९०.४५ टक्के, जालना- ९३.२५ टक्के आणि हिंगोली जिल्ह्याचा निकाल ८८.७१ टक्के लागला आहे.
मुलींच सरस
विभागात मुलांच्या तुलनेत ४.४१ टक्के मुलींनी निकालात आघाडी घेतली आहे. ९७ हजार ४८५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी ८८ हजार ९६१ जण उत्तिर्ण झाले. ७९ हजार ३६१ विद्यार्थ्यांनीपैकी ७५ हजार ९२४ जणी उत्तिर्ण झाल्या. यात विद्यार्थ्यांच्या उत्तिर्णतेचे प्रमाण ९१.२५ टक्के, तर विद्यार्थ्यांनींचे प्रमाण ९५.६६ टक्के आहे.
कॉपी प्रकरणातील ८९ जण नापास
परीक्षे दरम्यान कॉपी करताना आढळलेल्या १०४ प्रकरणांतील विद्यार्थ्यांची चौकशी करण्यात आल्यानंतर ८९ विद्यार्थ्यांच्या संबंधित पेपरचे गुण संपादणूक रद्द करण्यात आले आहेत, तर १५ जणांचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.
कॉपीमुक्तीचा परिणाम
यासंदर्भात अधिकाऱ्यांनी सांगितले की, यंदा कॉपीमुक्त अभियानाची प्रभावीपणे अंमलबजावणी झाल्यामुळे ३ टक्क्यांनी निकाल घसरला. यामध्ये प्रावीण्यासह उत्तिर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या १० टक्क्यांने कमी झाली आहे. विभागातील २६२७ माध्यमिक शाळांपैकी शून्य टक्के निकाल लागलेल्या ९ शाळा, तर शंभर टक्के निकाल लागलेल्या ६४४ शाळा आहेत. शंभर टक्के निकाल लागलेल्या शाळांपैकी बीड जिल्ह्यातील ३२.६ टक्के शाळा, जालना- २६.३६ टक्के शाळा, औरंगाबाद- २६.१६ टक्के शाळा, परभणी- १४.५७ टक्के शाळा आणि हिंगोली- १३.७१ टक्के शाळांचा समावेश आहे.