एसटी बस गेली ‘राजकारण्यांच्या सेवेसाठी’; प्रवाशांचे प्रचंड हाल, 'खासगी'ची मनमानी भाडेवसुली
By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2022 03:12 PM2022-10-06T15:12:31+5:302022-10-06T15:13:51+5:30
औरंगाबादेतून तब्बल २५० बस मुंबईतील बीकेसी मैदानावरील दसरा मेळाव्यासाठी गेल्या होत्या.
औरंगाबाद : अर्धा तास झाला... एक तास उलटला... तरी बस येईना, मगं कोणी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी फेऱ्या मारत होता, तर कोणी थेट जमिनीवर बसून बसची वाट पाहत होता. बऱ्याच वेळेनंतर एखादी बस येताच प्रवाशांचा तिच्याभोवती एकच गराडा पडत होता. दसऱ्या मेळाव्यासाठी औरंगाबादेतून २५० बस मुंबईला गेल्याने मंगळवारी प्रवाशांचे असे प्रचंड हाल झाले. एसटी महामंडळाचे ब्रीदवाक्य ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ हे आहे की ‘राजकारण्यांच्या सेवेसाठी’ हे आहे, असा सवाल प्रवाशांनी केला.
मुंबईत उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे दसरा मेळावे होणार आहेत. या मेळाव्यासाठी पदाधिकारी, कार्यकर्त्यांना मेळाव्यासाठी मुंबईला औरंगाबाद विभागाच्या २५० बस पाठविण्यात आल्या. प्रत्येक आगारातील काही बस यासाठी रवाना करण्यात आल्या. सकाळीच सिल्लोड, कन्नडमार्गे बहुतांश बसगाड्या मुंबईला रवाना झाल्या. औरंगाबाद विभागाबरोबर जालना विभागाच्या ७५ आणि अहमदनगर विभागाच्या २५ बसही रवाना झाल्या.
औरंगाबाद जिल्ह्यातील ५३६ पैकी २५० बस कमी झाल्याने सकाळपासूनच प्रवाशांना गैरसोयीला सामोरे जावे लागले. मध्यवर्ती बसस्थानकातून धावणाऱ्या गुलबर्गा, विजापूर, गाणगापूर आदी बस रद्द झाल्या. गंगापूर, पैठणसह ग्रामीण भागांतील बसगाड्यांची सेवा विस्कळीत झाली. अशा परिस्थितीत खासगी वाहतूकदार बसस्थानकात घुसून प्रवासी बाहेर नेत होते. बसगाड्या नसल्याची संधी साधत खासगी वाहतूकदार मनमानी भाडेवसुली करीत होते.
‘एसटी’चे अधिकारी म्हणाले...
एसटी महामंडळाचे विभाग नियंत्रक सचिन क्षीरसागर म्हणाले, निवडणूक, गौरी-गणपतीच्या कालावधीतही बस पाठविण्यात येेतात. त्याचप्रमाणे मुंबईसाठीही प्रासंगिक करारावर बस पाठविण्यात आल्या आहेत. इतर विभागाची बससेवा सुरळीत आहे. प्रवाशांची गैरसोय होणार नाही, याची काळजी घेण्यात आली आहे.
अर्धा तास ताटकळलो
पैठणला जाण्यासाठी बसस्थानकात आलो; पण अर्धा तास झाला तरी बस आलेली नाही. बस कधी येईल, हे कोणी सांगतही नव्हते. माझ्यासह अनेक जण ताटकळले. - भाऊसाहेब जायभाय, प्रवासी
मुंबईला बस गेल्याचे कळले
दुपारी १२ वाजता बसस्थानकात आलो. साडेबारा वाजून गेले तरी बस येण्याचा पत्ता नाही. इतर दिवशी थोड्या थोड्या अंतराने पैठणच्या बस येत होत्या. मुंबईला बस गेल्याने उशीर होत असल्याचे समजले.
- नीलेश हजारे, प्रवासी
औरंगाबाद विभागातून गेलेल्या बस आगार - बसची संख्या
सिडको बसस्थानक - ४८ मध्यवर्ती बसस्थानक - ४२ पैठण - ३०
सिल्लोड - ३६ वैजापूर - २८ कन्नड - २८ गंगापूर - २५ सोयगाव - १३ एकूण - २५०