स्मार्ट शहर बसच्या डेपोसाठी एसटी महामंडळ जागा देणार
By | Published: December 5, 2020 04:04 AM2020-12-05T04:04:04+5:302020-12-05T04:04:04+5:30
औरंगाबाद : स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत शहर बस सेवा सुरू करण्यात आली. शहर बस सेवेसाठी लागणारे अद्यावत डेपो उभारण्यासाठी महापालिकेकडून ...
औरंगाबाद : स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत शहर बस सेवा सुरू करण्यात आली. शहर बस सेवेसाठी लागणारे अद्यावत डेपो उभारण्यासाठी महापालिकेकडून जागेचा शोध सुरू होता. पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या यशस्वी शिष्टाईनंतर शुक्रवारी एसटी महामंडळाने मुकुंदवाडी आणि रेल्वे स्टेशन येथील जागा महापालिकेला देण्याचा निर्णय घेतला. महामंडळाचे ना हरकत प्रमाणपत्र लवकरच महापालिकेला प्राप्त होईल अशी अपेक्षा आज प्रशासक अस्तिककुमार पाण्डेय यांनी व्यक्त केली.
स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या माध्यमातून बस सेवा सुरु करण्यात आली. शंभर बस यासाठी घेण्यात आल्या आहेत. परंतु बस डेपोसाठी स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनकडे जागा नाही, त्यामुळे रेल्वे स्टेशन आणि मुकुंदवाडी येथील बस डेपोची जागा स्मार्ट सिटी कॉर्पोरेशनला मिळावी, अशी मागणी स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनतर्फे एसटी महामंडळाकडे करण्यात आली होती. महापालिका प्रशासनाने एसटीकडून जागा मिळविण्यासाठी भरपूर प्रयत्न केले. महामंडळाने पहिल्यापासूनच जागा देण्यास नकार दिला होता. पालकमंत्री सुभाष देसाई यांना महापालिकेकडून विनंती करण्यात आली होती. दरम्यान, एसटी महामंडळाच्या बस पोर्टचे व मध्यवर्ती बसस्थानकाच्या नवीन इमारतीचे काम केले जाणार आहे. या कामाच्या दीड कोटी रुपयांच्या विकास शुल्कात सुट देण्याचा प्रस्ताव एसटी महामंडळाने महापालिकेसमोर ठेवला होता. विकास शुल्काच्या मोबदल्यात नाममात्र दरात जागा द्यावी, अशी मागणी पुन्हा महापालिकेने केली होती. मुंबईत या संदर्भात अनेकदा बैठकाही घेण्यात आल्या. मात्र त्यातून काहीच निष्पन्न झाले नव्हते. गेल्या महिन्यात मुंबईत पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत बैठक झाली होती. मध्यंतरीच्या काळात निवडणूक आचारसंहितेमुळे कोणताच निर्णय घेण्यात आला नाही. पालकमंत्री सुभाष देसाई यांनी शुक्रवारी पालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांच्याशी मुंबईहून दूरध्वनीव्दारे संपर्क साधला आणि एसटी महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांनी सिटी बस डेपोसाठीच्या जागेला एनओसी देण्यास तयारी दाखवली आहे. बसडेपोच्या जागेसाठीचे एनओसी (ना हरकत प्रमाणपत्र) लवकरच प्राप्त होईल, अशी माहिती दिली. पालकमंत्र्यांनी दिलेल्या या माहितीमुळे सिटी बससाठी डेपो उभारण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.