एसीटी कर्मचाऱ्यांचा सुधारित वेतनवाढीनुसार पगार झाला, पण काम केलेल्यांनाच मिळाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2021 12:54 PM2021-12-08T12:54:00+5:302021-12-08T12:55:14+5:30
संपावर तोडगा म्हणून एसटीच्या चालक, वाहक, यांत्रिकी कर्मचारी व लिपिकांच्या मूळ पगारात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला.
औरंगाबाद : एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या संपाला महिना होत आहे. बहुतांश कर्मचारी अजूनही संपावर ठाम आहेत. यात नोव्हेंबरमध्ये काम केलेल्या कर्मचाऱ्यांचा मंगळवारी पगार झाला. जेवढे दिवस हजर, तेवढ्याच दिवसांचा नव्या वेतनवाढीनुसार पगार देण्यात आला आहे.
एसटी शासनात विलीन करण्याच्या मागणीसाठी ८ नोव्हेंबरपासून एसटी कर्मचारी संपावर आहेत. तब्बल महिना झाला तरी संप सुरूच आहे. संपावर तोडगा म्हणून एसटीच्या चालक, वाहक, यांत्रिकी कर्मचारी व लिपिकांच्या मूळ पगारात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. एसटीचे उत्पन्न वाढविण्यासाठी चालक-वाहकांचा मोठा हातभार असतो. यापुढे एसटीचे उत्पन्न वाढविण्यासाठी चालक-वाहक यांनी विशेष कार्य केल्यास त्यांना उत्पन्नवाढीबाबत प्रोत्साहन भत्ता देण्यात येईल, असेही जाहीर करण्यात आले आहे. परंतु वेतनवाढीनंतरही बहुतांश कर्मचारी संपावरच आहेत.
२० ते ३० बस धावतात
सध्या २० चालक आणि ८ वाहक कामावर हजर झालेले आहे. त्यांच्या माध्यमातून रोज १० ते १३ लाल बस रवाना होत आहे. तर १० ते १५ खासगी शिवशाही बस पुणे मार्गावर धावत आहेत.
२४१ कर्मचाऱ्यांवर कारवाई
एसटी महामंडळाच्या औरंगाबाद विभागात आतापर्यंत १३७ कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. निलंबित केल्यानंतर यातील ११ कर्मचारी आतापर्यंत कामावर परतले आहेत. तर तब्बल १०४ कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त करण्यात आली आहे.
२० जणांच्या बदल्या
एसटी महामंडळाने संपकरी कर्मचाऱ्यांची बदली करण्यास सुरुवात केली आहे. एसटी महामंडळाच्या औरंगाबाद विभागाने शनिवारी गंगापूर, सिडको बसस्थानक, मध्यवर्ती बसस्थानक, वैजापूर, सिल्लोड, पैठण, सोयगाव, कन्नड आगारातील २० कर्मचाऱ्यांची इतर आगारात बदली केली.
कामावर हजर होण्याचे आवाहन
सुधारित वेतनानुसार आणि नियमानुसार कर्मचाऱ्यांचा पगार करण्यात आला आहे. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी सर्व कर्मचाऱ्यांनी कामावर हजर व्हावे, असे आवाहन आहे.
- अरुण सिया, विभाग नियंत्रक
एकूण एसटी कर्मचारी- २६८४
- कामावर हजर झालेले कर्मचारी- ४८४
-अद्यापही संपात सहभागी- २२००