‘एसटी’ने केली पर्यटननगरीची ‘फसवणूक’; अजिंठा-वेरूळ मार्गावरून एसी पर्यटन बस गायब
By संतोष हिरेमठ | Published: April 14, 2023 01:34 PM2023-04-14T13:34:37+5:302023-04-14T13:35:38+5:30
विदेशी आणि देशी पर्यटकांना जगप्रसिद्ध अजिंठा आणि वेरूळ या ऐतिहासिक स्थळांना भेट देण्यासाठी खासगी वाहने किंवा एसटीच्या लाल बसमधून प्रवास करावा लागत आहे.
छत्रपती संभाजीनगर : जगप्रसिद्ध अजिंठा, वेरूळ लेणी पाहण्यासाठी पर्यटननगरीत येणाऱ्या पर्यटकांच्या सुविधेसाठी जिल्हा नियोजन समितीच्या १.८० कोटीच्या निधीतून सात वर्षांपूर्वी दोन वातानुकूलित बसची खरेदी करण्यात आली. परंतु या अजिंठा, वेरूळ मार्गावरून पर्यटन बस गायब झाल्या आहेत. मध्यवर्ती बस स्थानकातून साध्या बसेसने ही पर्यटनस्थळे गाठण्याची वेळ पर्यटकांवर ओढावत आहे. अजिंठा, वेरूळ मार्गावरून पर्यटन बस गायब करून ‘एसटी’ने पर्यटननगरीची ‘फसवणूक’ केल्याची ओरड पर्यटकांतून होत आहे.
वेरूळ, अजिंठा या लेण्यांमुळे शहराचे नाव जगभरात गेले आहे. जगभरातील पर्यटक पर्यटननगरीत दाखल होतात. ‘अतिथी देवो भव’प्रमाणेच त्यांना वागणूक दिली पाहिजे. पर्यटकांना वातानुकूलित बसमधून प्रवास करता यावा, यासाठी व्हॉल्वो बस खरेदी करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. आर्थिक चणचणीत असलेल्या एसटी विभागाने व्हॉल्वो खरेदी करण्यात असमर्थता दर्शविली होती. यामुळे पर्यटकांच्या सुविधेसाठी दोन व्हॉल्वो (वातानुकूलित बस) विकत घेण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून १ कोटी ८० लाखांचा निधी दिला होता. यातून प्राप्त झालेल्या दोन बसेस अजिंठा, वेरूळ मार्गावर चालविण्यात आल्या. परंतु, या बसेस आता कुठे आहेत, याची शोधाशोध करण्याची वेळ पर्यटकांवर ओढावत आहे.
खाजगी वाहने, लाल बसमधून प्रवास
विदेशी आणि देशी पर्यटकांना जगप्रसिद्ध अजिंठा आणि वेरूळ या ऐतिहासिक स्थळांना भेट देण्यासाठी खासगी वाहने किंवा एसटीच्या लाल बसमधून प्रवास करावा लागत आहे.
एसटी महामंडळाचे अधिकारी म्हणाले...
एसटी महामंडळाचे विभाग नियंत्रक सचिन क्षीरसागर म्हणाले, देखभाल-दुरुस्तीमुळे बस पुण्याला पाठविण्यात आल्या. त्यातील एक बस नुकतीच मिळाली. विभागाला लवकरच ई-बस मिळणार आहेत. यातून अजिंठा, वेरूळसाठी बस चालविण्यात येईल. मध्यवर्ती बस स्थानकाचे आगार व्यवस्थापक अविनाश साखरे म्हणाले, दोन वातानुकूलित बसपैकी एक दुरुस्तीसाठी पुण्याला आहे. दुसरी बस पुणे मार्गावर चालविण्यात येत आहे.
एसटी अधिकाऱ्यांची भेट
एसटी महामंडळाच्या बंद असलेल्या पर्यटन बस पुन्हा एकदा सुरू करण्याची मागणी केली आहे. त्यासंदर्भात एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांचीही भेट घेतली. लवकरच बसेस सुरू केल्या जातील, असे त्यांनी सांगितले आहे.
- दीपक हरणे, प्रादेशिक व्यवस्थापक, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ