खड्डेमय रस्त्यांचा ‘एसटी’ला फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2016 11:57 PM2016-04-25T23:57:36+5:302016-04-26T00:14:07+5:30
औरंगाबाद : मराठवाड्यातील रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी करण्यात आलेली घोषणा खड्ड्यात गेली आहे. काही ठिकाणी खड्डे थातुरमातुर भरले तर काही ठिकाणी निधीच नाही म्हणून काम झाले नाही,
औरंगाबाद : मराठवाड्यातील रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी करण्यात आलेली घोषणा खड्ड्यात गेली आहे. काही ठिकाणी खड्डे थातुरमातुर भरले तर काही ठिकाणी निधीच नाही म्हणून काम झाले नाही, अशा खड्डेमय रस्त्यांचा ‘एसटी’ला सर्वाधिक फटका सहन करावा लागत आहे. वारंवार स्प्रिंग तुटणे, टायर खराब होण्यासह संपूर्ण ‘एसटी’च खिळखिळी होण्याच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातील विविध गावांपर्यंत पोहोचविणाऱ्या रस्त्यांची अवस्था आजघडीला अत्यंत वाईट झालेली आहे. खड्डेमय रस्त्यांमुळे सर्वसामान्य वाहनधारकांचे हाल तर होत आहेतच; परंतु सर्वसामान्यांची जीवनवाहिनी म्हणून ओळख असलेल्या ‘एसटी’ला आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. ‘एसटी’तून प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांना खड्डेमय रस्त्यांचा त्रास सहन करावा लागत आहे. खड्डेमय रस्त्यांमधून सातत्याने ये-जा केल्यामुळे बसगाड्यांचे स्प्रिंग तुटण्यासह विविध पार्टस् खराब होत आहेत.
या अनेक बसगाड्यांचे टायर ऐन रस्त्यात पंक्चर होत आहेत. अनेकदा दुसरे टायर उपलब्ध नसते. अशा वेळी दुसऱ्या बसची व्यवस्था करण्यासाठी धावपळ होते. विभागीय कार्यशाळेत दुरुस्तीसाठी येणाऱ्या बसेसमध्ये पैठण, सिल्लोड, कन्नड आगारातील बसगाड्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे. खराब रस्त्यांमधून वारंवार बसेस गेल्यामुळे संपूर्ण बॉडीच खराब होत आहे. रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी महामंडळही संबंधित विभागाशी वेळोवेळी चर्चा करीत आहे.