स्मार्ट सिटीच्या बसला एसटीचा विरोध; स्थानकात बस आणू नका म्हणून कंट्रोलरने बजावले
By मुजीब देवणीकर | Published: August 27, 2022 01:26 PM2022-08-27T13:26:51+5:302022-08-27T13:28:53+5:30
रांजणगाव शेणपुंजी, वाळूज, बिडकीन, करमाड, फुलंब्री या गावांना सिटी बसच्या फेऱ्या सुरू झाल्या असून, ग्रामीण भागातील प्रवाशांकडून या सेवेला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
औरंगाबाद : स्मार्ट सिटीने ग्रामीण भागातही शहर बसची सेवा सुरू केली. या सेवेला प्रवाशांकडून चांगला प्रतिसादही मिळत आहे. त्यामुळेच फुलंब्री बसस्थानकावर स्मार्ट बसला उभे राहण्यास मज्जाव करून बसमध्ये बसणाऱ्या प्रवाशांना एसटी महामंडळाच्या कंट्रोलरने खाली उतरून दिले. एवढ्यावरच न थांबता यापुढे एकही स्मार्ट बस स्थानकात आणू नका, रस्त्यावर कुठेही उभी करा, असेही कंट्रोलरने बजावले. ही घटना शुक्रवारी सायंकाळी ५ वाजता घडली.
शहरालगत २० किमीपर्यंत शहर बस सुरू करण्यात आली. रांजणगाव शेणपुंजी, वाळूज, बिडकीन, करमाड, फुलंब्री या गावांना सिटी बसच्या फेऱ्या सुरू झाल्या असून, ग्रामीण भागातील प्रवाशांकडून या सेवेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्याचा परिणाम काळी-पिवळी, ॲपेरिक्षावर झाला असून, त्यांच्या प्रवाशांची संख्या एकदम घटली आहे. सुरक्षित प्रवास म्हणून शहर बसला प्रवाशांची पसंती वाढत आहे. फुलंब्रीसाठी मार्ग क्र. ४१ ची बस (क्र. एमएस २० ईएल ३१४५) ही सिडको बसस्थानकावरून दुपारी ४.१५ वाजता सुटली. सायंकाळी ५ वाजता ही बस फुलंब्रीमध्ये पोहोचली. यातील १९ प्रवासी उतरले. त्यानंतर ही बस वळविण्यासाठी बसस्थानकामध्ये नेण्यात आली.
बसचालक संदीप कोलगे हे बस वळवून घेत असताना काही प्रवासी बसमध्ये चढले. त्याचवेळी एसटी महामंडळाचे स्थानकातील कंट्रोलर या बसच्या समोर आले. त्यांनी बसमधील प्रवाशांना उतरून दिले. बसचालकाला म्हणाले, यापुढे बस वळविण्यासाठी बसस्थानकात आणू नये, आपल्या सहकाऱ्यांनादेखील सांगा. बस रस्त्यावर कुठेही उभी करा, अशी तंबी देतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला.
यासंदर्भात स्मार्ट सिटीचे बस व्यवस्थापक सिद्धार्थ बनसोड यांना यांनी सांगितले की, स्मार्ट बस सोबत घडलेली ही आजची घटना आहे. बसस्थानकात बस वळविण्यास विरोध केला असले, तर यापुढे बस रस्त्यावर वळविण्यात येतील. पोलीस प्रशासनाला सहकार्य करण्यासाठी पत्र दिले जाईल.