मालवाहतुकीने ‘रापमं’ची एसटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:02 AM2021-05-30T04:02:01+5:302021-05-30T04:02:01+5:30
खिशाला कात्री : परतीची मालवाहतूक मिळेपर्यंत करा मुक्काम, अन्यथा एसटी ट्रक सोडा अन् कसेही परत या... औरंगाबाद : ...
खिशाला कात्री : परतीची मालवाहतूक मिळेपर्यंत करा मुक्काम, अन्यथा एसटी ट्रक सोडा अन् कसेही परत या...
औरंगाबाद : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ म्हणजेच ‘एसटी’ने प्रवासी वाहतुकीबरोबरच व्यावसायिक मालवाहतुकीमध्ये दमदार वाटचाल केली आहे. मालवाहतुकीतून ‘एसटी’ मालामाल होत आहे, पण मालवाहतुकीसाठी दिवसरात्र परिश्रम करणाऱ्या चालकांवर मात्र, कंगाल होण्याची वेळ ओढावत आहे.
औरंगाबादहून गेल्यानंतर ४ ते ६ दिवस अन्य जिल्ह्यांतच मुक्काम करण्याची वेळ या चालकांवर येत आहे. कारण परतीसाठी मालवाहतूक मिळाली तरच परत यायचे, अशी अटच ‘एसटी’ने टाकली आहे. या कालावधीतील जेवणाचा खर्च, प्रसंगी परत येण्याचा खर्चही चालकांना स्वत:च्या खिशातून करावा लागत आहे.
एसटी महामंडळाने मालवाहतुकीत पाऊल टाकले आहे. मालवाहतुकीसाठी एसटी बसचा वापर केला जात आहे. त्यासाठी ‘एसटी’चे रूपांतर मालवाहू ट्रकमध्ये करण्यात आले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लावलेल्या निर्बंधांमुळे एसटीची प्रवासी सेवा ठप्प झाली आहे. त्यामुळे होणारा तोटा कमी करण्यासाठी मालवाहतूक महत्त्वाची ठरते आहे. औरंगाबाद विभागामध्ये गतवर्षी ऑगस्टमध्ये एसटीच्या ट्रकमधून मालवाहतूक सुरू केली. गेल्या काही दिवसांत जिल्ह्यात तसेच जिल्ह्याच्या बाहेर मालाचा पुरवठा करून उत्पन्न मिळविण्यात येत आहे. सुरक्षित प्रवासी वाहतूक म्हणून एसटीकडे पाहिले जाते. आता मालवाहतुकीकडेही सुरक्षिततेच्या दृष्टीने विशेष लक्ष देण्यात आले आहे. त्यामुळे एसटीची मालवाहतूक सेवा वाढत आहे; परंतु या सगळ्यात मालवाहतूक करणाऱ्या चालकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
---
जिल्ह्यात एकूण एसटी ट्रक-३०
वाहतूक सुरू असलेले ट्रक-३०
---
कोरोनाकाळात २.१० कोटींची कमाई
१. कोरोनाच्या प्रादुर्भावात गतवर्षी ऑगस्ट महिन्यात ‘एसटी’ची मालवाहतूक सेवा सुरू झाली. गेल्या ९ महिन्यांच्या कालावधीत औरंगाबाद विभागाला तब्बल २ कोटी १० लाख रुपयांचे उत्पन्न मालवाहतुकीतून मिळाले आहे.
२. औरंगाबाद विभागातील एसटी ट्रकने तब्बल ३ हजार २०० फेऱ्या केल्या. तब्बल ५ लाख १६ हजार कि.मी. अंतर पार करून एसटी ट्रकने राज्यभरात विविध माल पोहोचविला.
३. मालवाहतुकीसाठी जे चालक रात्रंदिवस कर्तव्य बजावत आहेत त्यांच्याकडे मात्र एसटी महामंडळाचे दुर्लक्ष होत आहे. परिणामी, कर्मचाऱ्यांतून नाराजी व्यक्त होत आहे.
----------
जेथे आहे तेथेच मुक्काम
- औरंगाबादहून विविध जिल्ह्यांत माल घेऊन गेल्यानंतर चालकांना परत येण्यासाठी ६-६ दिवस लागत आहे. जोपर्यंत परतीची मालवाहतूक मिळत नाही, तोपर्यंत जेथे गेले तेथेच मुक्काम करावा लागत आहे.
- औरंगाबादहून एखाद्या जिल्ह्यात गेल्यानंतर तेथून परतीसाठी औरंगाबादचीच मालवाहतूक मिळेल, असे नाही. चालकांना अन्य जिल्ह्यांतही मालवाहतुकीसाठी जावे लागते. दुसऱ्या जिल्ह्यातून मालवाहतूक मिळाली नाही तर एसटी ट्रक तेथेच सोडून चालकांना कसेबसे औरंगाबाद गाठावे लागते.
-------
अॅडव्हान्स मिळतो, पण वेतनातून होतो कट
-मालवाहतुकीदरम्यान चालकांकडे जेवणासाठीही पुरेसे पैसे नसतात. त्यात किमान तीन ते चार दिवस मुक्काम करण्याची वेळ ओढावते. त्यात चालकांची आर्थिक अडचण होते.
-चालकांना अॅडव्हान्स मिळतो, परंतु हा अॅडव्हान्स वेतनातून कपात केला जातो. आधीच पगार कमी असल्याने अनेक जण अॅडव्हान्स घेण्याचे टाळतात.
- चालकांना अॅडव्हान्सऐवजी मालवाहतुकीची फेरी करण्यासाठी काही रक्कम अॅलाऊन्स स्वरुपात मिळाली पाहिजे, अशी मागणी चालकांतून होत आहे.
- ‘एसटी’कडून अॅलाऊन्स मिळाला तर त्यातून जेवणाचा खर्च भागविता येतो. तसेच परतीसाठी मालवाहतूक नसेल तर अन्य वाहनांनी चालकांना परत येता येईल.
----
चालक म्हणतात....
आणखी अॅडव्हान्स घ्या म्हणे..
मालवाहतुकीसाठी गेलो, तेव्हा तब्बल ६ दिवस बाहेरच थांबावे लागले. कारण परतीसाठी मालवाहतूकच नव्हती. अॅडव्हान्सही संपून गेला. त्याविषयी वरिष्ठांना कळविले. तेव्हा आणखी अॅडव्हान्स देता येईल; पण माल घेऊनच यावे लागेल, असे सांगण्यात आले.
- एक चालक
--
ट्रक सोडून या, पण यायचे कसे?
औरंगाबादहून लातूरला माल घेऊन गेलो. तेथून तिसऱ्या दिवशी बीडला माल घेऊन गेलो. बीडवरून मालवाहतूक मिळाली नाही. तेव्हा तेथेच एसटी ट्रक सोडून परत येण्याची सूचना मिळाली. निर्बंधामुळे इतर वाहनांची वाहतूक नव्हती. कसे यायचे, याचा कोणी विचारच करत नाही.
-एक चालक
---------
प्रवासी आणि मालवाहतुकीत फरक
प्रवासी वाहतूक आणि मालवाहतूक यात फरक आहे. प्रवासी वाहतूक ही ठरलेली असते; परंतु मालवाहतुकीचे तसे नसते. चार ते पाच दिवसांच्या तयारीनेच चालकांनी आले पाहिजे. नियमानुसार कर्मचाऱ्यांना ‘डीए’ मिळत असतो.
- अरुण सिया, विभाग नियंत्रक, एसटी महामंडळ