‘एसटी’च्या अधिकाऱ्यांचा केला सत्कार, सिडको बसस्थानकातील ५ कर्मचाऱ्यांचे निलंबन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2021 08:03 PM2021-11-09T20:03:25+5:302021-11-09T20:04:30+5:30
ST Strike: बस घेऊन कर्तव्यावर जाणाऱ्या चालक-वाहकांचा संपकरी कर्मचाऱ्यांकडून सत्कार करण्यात येत होता
औरंगाबाद : सिडको बसस्थानकातील ५ कर्मचाऱ्यांवर मंगळवारी निलंबनाची कारवाई करण्यात आली. संपा दरम्यान बसची वाहतूक करणाऱ्या चालक-वाहकांचा संपकरी कर्मचाऱ्यांकडून सत्कार करण्यात येत होता. याविषयी अधिकाऱ्यांनी हटकले, तेव्हा संपकरी कर्मचाऱ्याकडून अधिकाऱ्यांनाच पुष्पहार घालण्यात आला. त्यातूनच ही कारवाई करण्यात आल्याचे म्हणत संपकरी कर्मचाऱ्यांनी संताप व्यक्त केला.
सिडको बसस्थानकाबाहेर काही संपकरी कर्मचारी मंगळवारी कर्तव्यावर जाणाऱ्या चालक-वाहकांना बसमध्ये जाऊन पुष्पहार घालत होते. हा प्रकार एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास पडला. यावेळी त्यांनी यासंदर्भात संपकरी कर्मचाऱ्यांना विचारणा केली. तेव्हा सदर अधिकारीदेखील कर्तव्यावर जाणारे कर्मचारीच असल्याचा समज करून संपकरी कर्मचाऱ्याने त्यांना पुष्पहार घातला. या सगळ्याप्रकारानंतर सायंकाळी अचानक सिडको बसस्थानकातील ५ कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले. यात अधिकाऱ्यांना पुष्पहार घालणाऱ्या कर्मचाऱ्याचा समावेश आहे.
मात्र, इतर कर्मचाऱ्यांचा काहीही संबंध नसताना निलंबन करण्यात आले. शिवाय शांततेच्या मार्गाने कर्तव्यावर जाणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात येत होता. त्यावेळी गैरसमजूतीतून अधिकाऱ्यांना पुष्पहार घातला गेल्याचे संपकरी कर्मचाऱ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. यासंदर्भात सिडको बसस्थानकाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी ५ कर्मचाऱ्यांचे निलंबन झाल्याचे सांगितले. निलंबनाच्या कारणासंदर्भात माहिती घेण्यासाठी विभाग नियंत्रक अरुण सिया, विभागीय वाहतूक अधिकारी अमोल अहिरे यांच्याशी वारंवार संपर्क साधण्यात आला. मात्र, त्यांनी फोन घेतला नाही.