ST Strike: एसटीने आणली खासगी बस रस्त्यावर; दोन बस केल्या पुणे मार्गावर रवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2021 07:15 PM2021-11-13T19:15:42+5:302021-11-13T19:16:27+5:30
ST Strike: संघटनांशिवाय कर्मचारी एकत्र आले असून, पाच दिवसांपासून संपात सहभागी झाले आहेत.
औरंगाबाद: गेल्या सलग पाच दिवासांपासून एसटी कर्मचारी संपावर (ST Strike ) आहेत. त्यामुळे बससेवा ठप्प आहे. मात्र, शुक्रवारी एसटी महामंडळाने खासगी पुणे मार्गावर बंदोबस्तात खासगी बस रस्त्यावर आणली. त्यामुळे पुणे मार्गावरील प्रवाशांना काहीसा दिलासा मिळाला.
संघटनांशिवाय कर्मचारी एकत्र आले असून, पाच दिवसांपासून संपात सहभागी झाले आहेत. विविध पक्ष संघटना बसस्थानकात येऊन कर्मचाऱ्यांना पाठिंबा देत आहेत. शुक्रवारी आ. अतुल सावे, संजय केणेकर, राजू शिंदे यांनी कर्मचाऱ्यांची भेट घेतली. या संपात शंभर टक्के कर्मचारी सहभागी झाल्याने एसटीची प्रवासी सेवा ठप्प झाली आहे. जिल्हाभरातील एकाही आगारातून बस निघाल्या नाहीत. त्यामुळे शुक्रवारी प्रशासनाने मध्यवर्ती बसस्थानकातून पुण्यासाठी दोन खासगी शिवशाही रवाना केल्या. एका बसमध्ये २५, तर दुसऱ्या बसमध्ये ३५ प्रवासी पुण्याला गेल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. विभागात ११ खासगी शिवशाही बस आहेत. टप्प्या-टप्प्याने पुणे आणि नाशिकसाठी या बसगाड्या वाढवण्यात येत आहेत.
खिचडीची पंगत
एसटीचे कर्मचारी संपात सहभागी झाले असून, त्यांना संपाच्या ठिकाणाहून घरी जाणे शक्य होत नसल्याने शुक्रवारी मध्यवर्ती बसस्थानकात खिचडीची पंगत झाली. महिला कर्मचारी मुलांसह आंदोलनाच्या ठिकाणी उपस्थित होते. एसटीचे शासनात विलीनीकरण झालेच पाहिजे, अशा घोषणाही कर्मचाऱ्यांनी दिल्या.
आंदोलन बाहेर करा
एसटीच्या अधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांना बस स्थानकाबाहेर आंदोलन करण्याची सूचना केली. त्यामुळे सकाळी काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, कर्मचारी दिवसभर बसस्थानकातच ठाण मांडून आंदोलन करत होते.