ST Strike : प्रस्ताव मान्य नाही, पगारवाढ नको, विलीनीकरण करा; एसीटी कर्मचारी संपावर कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2021 08:38 PM2021-11-24T20:38:24+5:302021-11-24T20:39:29+5:30
ST Strike : पगार वाढ फारच कमी आहे, विलीनीकरणामुळेच योग्य तो न्याय मिळेल.
औरंगाबाद : आमचा लढा शासनात विलीकारणाचा आहे, मंत्री महोदयांनी दिलेला पगारवाढीचा प्रस्ताव आम्हाला मान्य नाही. यासाठी ४२ कर्मचाऱ्यांनी बलिदान दिले आहे. विलीनीकरण प्रस्ताव स्वीकारणे म्हणजे त्यांच्या बलिदानाचा अपमान करण्यासारखे आहे. आम्ही विलीनीकरणावर ठाम आहोत, असा निर्धार औरंगाबाद येथील एसटी कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला.
परिवहन मंत्री अनिल परब यांनी आज पत्रकार परिषद घेऊन एसटी कर्मचाऱ्यांना आतापर्यंतची सर्वात मोठी पगारवाढ जाहीर केली. त्यांच्यासोबत एसटी कर्मचाऱ्यांची बाजू घेणारे भाजपचे आमदार सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर हे देखील पत्रकार परिषदेत उपस्थित होते. अनुभवानुसार मूळ वेतनात पगार वाढीचा ऐतिहासिक प्रस्ताव मंत्री परब यांनी सादर करत एसटी कर्मचाऱ्यांनी उद्यापासून कामावर रुजू होण्याची विनंती केली. तसेच कर्मचाऱ्यांवरील निलंबन देखील मागे घेणार असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले. मात्र, या प्रस्तावास शहरातील एसटी कर्मचाऱ्यांनी विरोध दर्शवला आहे.
आमचा लढा विलीनीकरणाचा
सिडको, चिकलठाणा वर्कशॉप आणि मध्यवर्ती बसस्थानकात एसीटीचे कर्मचारी विलीनीकरणाच्या मागणीसाठी संप करत आहेत. आज संध्याकाळी परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिलेला प्रस्ताव आम्हाला अमान्य असल्याची भूमिका आंदोलकांनी जाहीर केली आहे. विद्यार्थी, सामान्य जनता यांचे हाल होत आहेत त्याबद्दल आमची सहानभूती आहे. विलीनीकरणाचा फायदा आमच्यासोबत सामान्य जनतेला सुद्धा होणार आहे. पगार वाढ फारच कमी आहे, विलीनीकरणामुळेच योग्य तो न्याय मिळेल, असे आंदोलकांनी यावेळी सांगितले.