ST Strike: एसटीप्रमाणे भाडे घ्या, प्रवाशांची लूट केली तर खाजगी वाहनांवर कारवाईचा बडगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2021 04:31 PM2021-11-11T16:31:18+5:302021-11-11T16:31:43+5:30
ST Strike: आरटीओ कार्यालयाचे १७ निरीक्षक रस्त्यांवर असून त्यांची खासगी वाहन चालकांच्या मनमानीवर नजर आहे.
औरंगाबाद : एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा (ST Strike )फायदा घेत प्रवाशांची आर्थिक लूट करणाऱ्या खासगी वाहनांचा बंदोबस्त करण्यासाठी आरटीओ कार्यालयाचे १७ निरीक्षक रस्त्यावर उतरले आहेत. प्रवाशांना वाहतूक सुविधेचे नियोजन करून देण्यासह एसटीप्रमाणे किफायतशीर भाडे आकारणी होईल, यावर ते नजर ठेवून आहेत. प्रवाशांची लूट करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे.
एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्याने खासगी वाहनांना प्रवासी वाहतूक करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र त्यांच्याकडून किती भाडे आकारण्यात यावे, याकडे यंत्रणेचे दुर्लक्ष होत आहे. परिणामी, खासगी वाहतूकदार मनमानी भाडे आकारून प्रवाशांचा खिसा रिकामा करीत आहेत. यासंदर्भात ‘लोकमत’ने १० नोव्हेंबर रोजी ‘मनमानी भाडे वसुली रोखणार कोण? ’ या मथळ्याखाली सविस्तर वृत्त प्रकाशित केले. त्यानंतर आरटीओ कार्यालयाकडून सिडको, मध्यवर्ती बसस्थानकासह ग्रामीण भागांतील बसस्थानकांवर संपर्क अधिकारी म्हणून मोटार वाहन निरीक्षक आणि सहायक मोटार वाहन निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली. त्याबरोबर ज्या ज्या ठिकाणाहून प्रवाशांची वाहतूक होते, तेथेही निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. या सर्व ठिकाणाहून प्रवाशांची वाहतूक सुरळीतपणे होईल, यादृष्टीने निरीक्षकांकडून बुधवारी प्रयत्न करण्यात आला. पुण्यासह विविध ठिकाणी जाणाऱ्या प्रवाशांच्या सुविधेसाठी आरटीओ कार्यालयाकडून वाहनांचे नियोजनदेखील करण्यात आले.
बसस्थानकात पोलीस बंदोबस्त
एसटी कर्मचाऱ्यांचा सलग तिसऱ्या दिवशीही बुधवारी संप सुरूच राहिला. मध्यवर्ती बसस्थानकात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. खासगी वाहनांमधून प्रवासी वाहतूक करण्यातून गोंधळ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत हाेती. बसस्थानकाबाहेरील रस्त्यावरून खासगी वाहनांतून प्रवाशांची वाहतूक सुरू होती.
जास्त भाडे घेणाऱ्यांवर कारवाई
‘एसटी’प्रमाणे खासगी वाहनचालकांनी भाडे आकारावे, अशी सूचना करण्यात आली आहे. प्रवाशांकडून जास्तीचे भाडे घेणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. प्रवाशांची गैरसोय होणार नाही, याकडे लक्ष दिले जात आहे. बसस्थानकाच्या आत खासगी वाहने नेऊन प्रवासी घेऊन जाता येणार नाही. कारण त्यातून वादविवाद होऊ शकतात.
- संजय मेत्रेवार, प्रादेशिक परिवहन अधिकारी