ST Strike: कर्मचाऱ्यांची घर चालविण्याची कसरत; कोणाच्या हाती ट्रकचे स्टिअरिंग, तर कोणाच्या फावडा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2022 01:01 PM2022-01-27T13:01:23+5:302022-01-27T13:03:14+5:30
ST Strike: अडीच महिन्यांपासून संप सुरूच असून कर्मचाऱ्यांची आर्थिक परिस्थिती खालावली आहे.
- संतोष हिरेमठ
औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यातील संपकरी कर्मचाऱ्यांची परिस्थिती बिकट होत आहे. संपात सहभागी असलेले काही चालक खासगी वाहन, ट्रकवर बदली चालक म्हणून कामाला जात आहेत, कोणी हातात फावडा घेऊन बांधकामाला जात आहेत, तर काही कर्मचाऱ्यांच्या पत्नी संसाराचे ‘स्टिअरिंग’ सांभाळत आहेत.
एसटी महामंडळातील कर्मचारी गेल्या अडीच महिन्यांपासून संपावर आहेत. अद्याप अनेक कर्मचारी संपावर ठाम आहेत. या सगळ्यात घर चालविण्याची कसरत कर्मचाऱ्यांना करावी लागत आहे. त्यामुळे बसस्थानकात आंदोलनाच्या ठिकाणी काही वेळ हजेरी लावून कर्मचारी उदरनिर्वाहाच्या दृष्टीने अन्य काम करीत आहेत. वेतनाअभावी कोणाचे घरभाडे थकले आहे, तर कोणाकडे किराणा दुकानदाराची थकबाकी वाढत आहे.
पत्नीच्या हाती संसाराचे ‘स्टिअरिंग’
चालक ज्ञानेश्वर मुंढे म्हणाले, बडतर्फीची कारवाई झालेली आहे. एक मुलगा आणि एक मुलगी आहे. पत्नी शिवणकाम करते. सध्या तिच्यामुळे घर चालत आहे. परिस्थितीमुळे दागिने मोडण्याची वेळ आली. किरायाचे घर आहे. कसे तरी दिवस काढत आहे. न्यायालय जो निर्णय देईल, तो मान्य असेल.
मोलमजुरी करून चालवतोय गाडा
वाहक उल्हास चव्हाण म्हणाले, सध्या मोलमजुरी करून संसाराचा गाडा चालवित आहे. मी वाहक आहे. पण, सध्या घराच्या बांधकामाच्या ठिकाणी कामाला जात आहे. साडेचारशे रुपये हजेरी मिळते. पत्नीदेखील कामाला जात आहे. दोन मुले आहेत. स्वत:चे घर आहे. परंतु कुटुंब चालविण्यासाठी आम्हा दोघांनाही कामाला जावे लागत आहे.
कोणी ट्रकवर, कोणी खासगी वाहनावर
सध्या संपावर असलेले अनेक चालक खासगी वाहनावर बदली चालक म्हणून जात आहेत, तर कोणी ट्रकवर चालक म्हणून काम करीत आहे. काही कर्मचारी कपड्याच्या दुकानात काम करीत आहेत. काही कर्मचाऱ्यांची मुले नोकरी, व्यवसाय करतात. तर कोणाचा संसार पत्नीच्या मदतीने सुरळीत सुरु असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले.
८८ कर्मचारी बडतर्फ
एसटी महामंडळाच्या औरंगाबाद विभागात आतापर्यंत ८८ कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई करण्यात आली आहे, तर १५७ कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
कामावर येण्याचे आवाहन
ज्यांच्यावर कारवाई झालेली नाही, अशा कर्मचाऱ्यांनी कामावर यावे, असे आवाहन आहे. आतापर्यंत विभागात ८८ कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई करण्यात आली आहे.
- अरुण सिया, विभाग नियंत्रक
-एसटी एकूण कर्मचारी-२,६८९
-कामावर परतलेले -१,०४८
- कामावर न परतलेले -१,६४१