‘लालपरी’चा रुसवा ! एसटी कर्मचाऱ्यांना आजची डेडलाईन; उद्यापासून तीव्र कारवाई होणार का ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2021 01:37 PM2021-12-13T13:37:46+5:302021-12-13T13:39:06+5:30
ST Strike : काही चालक-वाहक कर्मचारी ड्यूटीवर हजर होत असल्याने काही प्रमाणात बससेवा चालवण्यात येत आहे.
औरंगाबाद : कामावर हजर व्हावे, अन्यथा सोमवारनंतर कारवाई तीव्र करण्यात येईल, असा इशारा परिवहनमंत्र्यांनी (Anil Parab) संपकरी एसटी (ST Strike ) कर्मचाऱ्यांना दिला आहे. आजघडीला कार्यालयीन आणि यांत्रिकी कर्मचारी हजर झालेले आहेत. आता सोमवारी किती चालक-वाहक कामावर हजर होतात किंवा संपावर ठाम राहतात, याकडे लक्ष लागले आहे.
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे प्रवासी सेवेवर परिणाम झालेला आहे. काही चालक-वाहक कर्मचारी ड्यूटीवर हजर होत असल्याने काही प्रमाणात बससेवा चालवण्यात येत आहे. २२ चालक, तीन चालक कम वाहक आणि ३६ वाहक अशा ६१ कर्मचाऱ्यांनी रविवारी सेवा बजावली आहे. रुजू झालेल्या या चालक-वाहकांच्या मदतीने रविवारी जिल्ह्यात ४० बस चालविण्यात आल्या. या बसगाड्यांच्या दिवसभरात ६२ फेऱ्या झाल्या. त्यातून दोन हजारांपेक्षा अधिक प्रवाशांनी प्रवास केला. मध्यवर्ती बसस्थानकातून रविवारी औरंगाबाद - पुणे मार्गावर १८ शिवशाहीतून ७३८ प्रवाशांनी प्रवास केला. तर नाशिक मार्गावर तीन खाजगी शिवशाही बसमधून ११० प्रवाशांनी प्रवास केला. याशिवाय सिडको बसस्थानकातून जालना मार्गावर ८ ‘लालपरी’ने १६ फेऱ्या केल्या. त्यातून १४६ प्रवाशांनी प्रवास केला.
ग्रामीण भागातही धावली बस
मध्यवर्ती बसस्थानकातून सिल्लोड मार्गावर ४ बसच्या ८ फेऱ्या झाल्या, कन्नड मार्गावर एका बसने दोन फेऱ्या केल्या. कन्नड आगाराच्या ४ बसने औरंगाबाद मार्गावर ८ फेऱ्या केल्या. सोयगाव आगाराच्या दोन बसने औरंगाबाद मार्गावर ४ फेऱ्या मारल्या. एकूण १९ साध्या आणि २१ शिवशाही अशा ४० बसने ६२ फेऱ्या केल्या. यातून २०३१ प्रवाशांनी प्रवास केला.