एस.टी.कडे कोटींची तिकिटे शिल्लक

By Admin | Published: December 29, 2014 12:58 AM2014-12-29T00:58:41+5:302014-12-29T01:07:50+5:30

संतोष हिरेमठ, औरंगाबाद प्रवाशांनी खचाखच भरलेल्या बसमध्ये एका हातात तिकिटांचा ट्रे सांभाळायचा...दुसऱ्या हाताने प्रवाशांना तिकिटे द्यायचे...प्रवाशांकडून तिकिटांची रक्कम घ्यायची...नोंदही करायची...

ST tickets have crores tickets | एस.टी.कडे कोटींची तिकिटे शिल्लक

एस.टी.कडे कोटींची तिकिटे शिल्लक

googlenewsNext

संतोष हिरेमठ, औरंगाबाद
प्रवाशांनी खचाखच भरलेल्या बसमध्ये एका हातात तिकिटांचा ट्रे सांभाळायचा...दुसऱ्या हाताने प्रवाशांना तिकिटे द्यायचे...प्रवाशांकडून तिकिटांची रक्कम घ्यायची...नोंदही करायची...अशा कसरतीपासून सुटका होण्यासाठी एस. टी. महामंडळाने आधुनिक तिकीट मशीनचा वापर सुरू केला. परंतु हा वापर सुरू करताना महामंडळाला शिल्लक ट्रे तिकिटांचा विसर पडला. त्यामुळे आता कोट्यवधी रुपयांच्या तिकिटांचा साठा संपविण्याच्या आव्हानाला महामंडळाला सामोरे जावे लागत आहे. एकट्या औरंगाबादच्या विभागीय कार्यालयात जवळपास १३ कोटींची तिकिटे शिल्लक आहेत.
राज्यातील गावागावांमध्ये पोहोचलेली आणि महाराष्ट्राची लोकवाहिनी म्हणून प्रसिद्धीस आलेल्या एस.टी.ने सुधारणांच्या प्रवाहात येण्यास सुरुवात केली. जुन्या कामकाजाच्या पद्धतीची कात टाकत आधुनिक तेची कास धरण्याचा वसा घेतला.
यामध्ये इलेक्ट्रॉनिक तिकीट इश्यू मशीनची योजना आणली. वाहकांना ट्रे सांभाळून, हिशोब करून द्याव्या लागणाऱ्या तिकिटांच्या कटकटीपासून सुटका करण्यासाठी ही आधुनिक तिकीट मशीन महत्त्वाची ठरू लागली.
यामुळे प्रवाशांची संख्या, किती रुपयांची तिकिटे संपली आदी नोंदी करण्याच्या त्रासातून सुटका झाल्याने वाहकांच्या कामाचा भारही हलका झाला. परंतु आता पुन्हा ट्रे तिकीट सांभाळण्याची वेळ वाहकांवर येत असल्याचे चित्र दिसून येत आहे. हायटेककडे वळत असताना ट्रे तिकिटांचा हिशोब ठेवण्यासाठी वाहकांना पुन्हा एकदा ट्रे तिकिटांचा हिशोब करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे.
विभागात १३ कोटींची तिकिटे
राज्य परिवहन महामंडळाच्या औरंगाबादच्या विभागीय कार्यालयात जवळपास १३ कोटींची तिकिटे शिल्लक आहेत. याशिवाय मशीनद्वारे तिकीट देणे सुरू झाल्यापासून आतापर्यंत जवळपास ५ कोटींची तिकिटे वितरित करण्यात आली आहेत. विभागातील आगारांना वेळोवेळी या तिकिटांचे वितरण केले जात असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. याशिवाय विभागातील आगारांमध्ये लाखोंची ट्रे तिकीट शिल्लक आहेत.
मध्यवर्ती बसस्थानकास
२३ लाखांची तिकिटे
मध्यवर्ती बसस्थानकास १९ डिसेंबरला तब्बल २३ लाख ९५ हजार रुपयांची ट्रे तिकिटे देण्यात आली आहेत. मशीन बंद पडल्यास ट्रे उपयोगी पडेल, असे सांगितले जात आहे. तर अनेक मार्गांवर ट्रे तिकीट खपविण्याची सक्ती केली जात आहे. त्यामुळे मशीन आणि ट्रे दोन्हींचा सांभाळ वाहकांना करावा लागत आहे.
दुर्लक्ष केल्याचा परिणाम
मशीनचा वापर सुरू करण्याआधीच शिल्लक ट्रे तिकिटे संपविण्याची आवश्यकता होती; परंतु त्याबाबत नियोजनाकडे दुर्लक्ष झाल्याचेच चित्र दिसून येते. त्यामुळे कोट्यवधींची तिकिटे गेली काही वर्षे नुसती पडून होती. आता शिल्लक तिकिटे संपविण्याला महामंडळाला सामोरे जावे लागत आहे.
तिकिटांचे वितरण
विभागात ट्रे तिकिटे आहेत. या तिकिटांचे वितरण केले जात असल्याचे राज्य परिवहन महामंडळाचे विभाग नियंत्रक संजय सुपेकर यांनी सांगितले.

Web Title: ST tickets have crores tickets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.