एस.टी.ची चाके रुतली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2017 12:17 AM2017-10-18T00:17:16+5:302017-10-18T00:17:16+5:30
बीड जिल्ह्यात सोमवारी मध्यरात्रीपासून मंगळवारी सायंकाळपर्यंत एकही बस स्थानकातून बाहेर पडली नव्हती.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : वेतनवाढीच्या मुख्य मागणीसाठी राज्यभर सर्वत्र कर्मचा-यांनी बेमुदत संप पुकारला आहे. ऐन सणासुदीच्या दिवसात हा संप पुकारल्यामुळे खाजगी वाहतूकदारांकडून प्रवाशांची मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट केली जात आहे. हा सण म्हणजे प्रवाशांसाठी शिमगा, तर खाजगी वाहनधारकांसाठी दिवाळी ठरला आहे. दरम्यान, बीड जिल्ह्यात सोमवारी मध्यरात्रीपासून मंगळवारी सायंकाळपर्यंत एकही बस स्थानकातून बाहेर पडली नव्हती. जिल्ह्यात १०० टक्के संप यशस्वी झाल्याचा दावा संघटनांनी केला आहे.
१ एप्रिल २०१६ पासून एस.टी. कर्मचा-यांना राज्यातील शासकीय कर्मचाºयांप्रमाणे मिळणा-या वेतनश्रेणी, वेतन, विविध भत्ते, सेवा-सवलतींसह सेवा ज्येष्ठतेनुसार पदनिहाय सातवा वेतन आयोग लागू करावा, वाढीव ७ टक्के महागाई भत्ता, तसेच जानेवारी २०१७ पासून वाढीव ४ टक्के महागाई भत्त्याची थकबाकी तात्काळ अदा करावी, यासारख्या २४ विविध मागण्यांसाठी एस.टी. कर्मचा-यांनी राज्यभर संप पुकारला आहे. सोमवारी मुख्यमंत्र्यांसोबत संघटनांची बैठक झाली; परंतु त्यांच्याकडून समाधानकारक तोडगा न निघाल्यामुळे सोमवारी मध्यरात्री राज्यातील एकाही स्थानकातून बस बाहेर पडली नाही.
बीड जिल्ह्यातील ८ आगारांच्या जवळपास १८ स्थानकांमधून बस बाहेर पडली नाही.
अनेकांना हा संप माहीत नसल्यामुळे ते नेहमीप्रमाणे स्थानकात येत होते. येथे आल्यानंतर त्यांना संपाबाबत माहिती मिळताच खाजगी वाहनांकडे धाव घेतली.
मंगळवारी दिवसभर जिल्हाभरात खाजगी वाहनधारकांची ‘दिवाळी’ जोरात साजरी झाली, तर जादा तिकीटदर आकारला जात असल्याने प्रवाशांवर ‘शिमगा’ करण्याची वेळ आली.