सुरक्षित मातृत्वाचा आनंदोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2017 12:34 AM2017-08-31T00:34:03+5:302017-08-31T00:34:03+5:30
एसटी महामंडळातील महिला कर्मचाºयांना हक्काच्या प्रसूती रजेबरोबरच ३ महिने अतिरिक्त पगारी रजा देण्याच्या निर्णयाचा आनंदोत्सव मंगळवारी साजरा करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : एसटी महामंडळातील महिला कर्मचाºयांना हक्काच्या प्रसूती रजेबरोबरच ३ महिने अतिरिक्त पगारी रजा देण्याच्या निर्णयाचा आनंदोत्सव मंगळवारी साजरा करण्यात आला. स्त्रीचे मातृत्व कोणत्याही परिस्थितीत हिरावून घेतले जाणार नाही, या भावनेतून अखेर हा निर्णय घेण्यात आला. महामंडळातील महिला कर्मचाºयांनी एकमेकांना पेढे भरवत हा क्षण साजरा केला.
एसटी महामंडळातील राज्यभरात काही महिला वाहकांचे अचानक गर्भपात झाल्याचा मन हेलावणारा प्रकार ‘लोकमत’ने १४ जुलै रोजी समोर आणला. याविषयी सर्वस्तरातून तीव्र पडसाद उमटले. अनेकांनी महामंडळाच्या कारभारावर टीकेची झोड उठवली. महाराष्ट्र एसटी कामगार संघटना, महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीसह अन्य संघटनांनी या घटनेचा निषेध व्यक्त करीत महिला वाहकांना न्याय मिळवून द्यावा,अशी मागणी परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्याकडे केली. यासंदर्भात विविध वृत्तांद्वारे ‘लोकमत’ने पाठपुरावा केला.
‘लोकमत’ने केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले. एसटी महामंडळातील हजारो महिला कर्मचाºयांना दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला. हक्काच्या प्रसूतीबरोबर ३ महिने अतिरिक्त पगारी रजा देण्याची घोषणा परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी केली. यामुळे एसटी महामंडळातील महिला कर्मचाºयांना यापुढे ९ महिने प्रसूती रजा मिळणार आहे.
एसटीतील महिला कर्मचाºयांना नियमानुसार २६ आठवडे प्रसूती रजा दिली जात होती. ही रजा केव्हा घ्यायची हा त्या महिला कर्मचाºयाचा निर्णय असतो. बहुतांश महिला बाळाच्या जन्मानंतर संगोपनासाठी अधिक वेळ मिळावा, म्हणून उशिरा रजा घेण्यावर भर देतात. अशावेळी टेबलवर्क देण्याकडे दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे नाईलाजाने कर्तव्यावर जाण्याची वेळ महिला वाहकांवर येत होती. यातूनच गर्भपाताच्या दुर्दैवी प्रकाराला सामोरे जाण्याची वेळ अनेक महिला वाहकांवर आली; या निर्णयामुळे अशी वेळ कोणावरही ओढवणार नाही, अशी आशा व्यक्त होत आहे. या निर्णयाचा लाभ सुमारे ४ हजार ५०० महिलांना मिळेल.