दारूसाठी पैसे न दिल्याने लहान भावावर चाकूहल्ला; आरोपी फरार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 07:33 PM2021-05-13T19:33:03+5:302021-05-13T19:35:24+5:30
तू कामधंदा कर आणि तुझे व्यसन भागव. मला पैसे मागू नको याचा राग आल्याने केला हल्ला
औरंगाबाद : दारूसाठी पैसे न दिल्यामुळे सख्ख्या भावाने लहान भावावर चाकूहल्ला करून त्याचा जीव घेण्याचा प्रयत्न केल्याची घटना ७ मे रोजी मुकुंदवाडी परिसरात घडली. या प्रकरणी १२ मे रोजी मुकुंदवाडी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. हल्लेखोर आरोपी फरार झाला आहे. अशोक बाबूराव नागरे (३२) असे आरोपीचे नाव आहे. जखमी प्रकाश बाबूराव नागरे (२२, रा. मुकुंदवाडी) याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अशोकला दारूचे व्यसन आहे. ७ मे रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास प्रकाश घरात बसलेला होता. या वेळी अशोकने त्याच्याकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले. तू कामधंदा कर आणि तुझे व्यसन भागव. मला पैसे मागू नको, असे त्यांनी त्याला सांगितले. याचा राग आल्याने अशोकने त्याला शिवीगाळ केली. मोठा भाऊ असल्याने प्रकाश त्याला समजावून सांगत असताना अशोकने अचानक घरातून चाकू आणला आणि प्रकाशच्या पोटात खुपसला. तसेच प्रकाशच्या डाव्या हाताच्या दंडाला चावा घेतला.
या घटनेत गंभीर जखमी झालेल्या प्रकाशला रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी डॉक्टरांनी दिलेल्या प्रमाणपत्राच्या आधारे अशोकने प्रकाशला जीवे मारण्याच्या उद्देशाने खुनी हल्ला केल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी प्रकाश यांची तक्रार नोंदवून घेत अशोकविरुद्ध गुन्हा नोंदविला. पोलीस उपनिरीक्षक अमोल म्हस्के तपास करीत आहेत.
घटनेपासून आरोपी फरार
लहान भावावर प्राणघातक हल्ला केल्यापासून अशोक नागरे फरार आहे. पोलिसांनी आरोपीचा कसोशीने शोध सुरू केल्याचे पोलीस निरीक्षक शरद इंगळे यांनी सांगितले.