औरंगाबाद मनपा ‘स्थायी’च्या बैठकीत पाण्यासाठी ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2018 12:15 AM2018-01-12T00:15:35+5:302018-01-12T00:15:56+5:30

मनपा स्थायी समिती बैठकीत पाणीपुरवठ्यावरून सभापती गजानन बारवाल यांची एमआयएम आणि शिवसेना सदस्यांनी कोंडी करण्याचा प्रयत्न केला. बैठक तहकूब करून बारवाल यांनी दोन्ही पक्षांना शह देण्याचा प्रयत्न केला.

Stage for water at Aurangabad Municipal 'Permanent' meeting | औरंगाबाद मनपा ‘स्थायी’च्या बैठकीत पाण्यासाठी ठिय्या

औरंगाबाद मनपा ‘स्थायी’च्या बैठकीत पाण्यासाठी ठिय्या

googlenewsNext
ठळक मुद्देसभापतींची कोंडी : कार्यकारी अभियंत्यांच्या बदलीची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : मनपा स्थायी समिती बैठकीत पाणीपुरवठ्यावरून सभापती गजानन बारवाल यांची एमआयएम आणि शिवसेना सदस्यांनी कोंडी करण्याचा प्रयत्न केला. बैठक तहकूब करून बारवाल यांनी दोन्ही पक्षांना शह देण्याचा प्रयत्न केला.
जुन्या शहराला सुरळीत पाणीपुरवठा करण्याची मागणी एमआयएमच्या नगरसेवकांनी लावून धरत ठिय्या दिला, तर कार्यकारी अभियंता सरताजसिंग चहल यांची पाणीपुरवठा विभागातून बदली करण्याची मागणी शिवसेनेने केली.
बैठकीत एमआयएमचे नगरसेवक सय्यद मतीन यांनी जुन्या शहराचा पाणी प्रश्नाचा मुद्दा पुढे आणला. ते म्हणाले, गेल्या सहा महिन्यांपासून जुन्या शहराला समान पाणी देण्याची मागणी केली जात आहे; परंतु त्यावर निर्णय होत नाही.
अनेक वेळा स्थायी समिती, सर्वसाधारण सभेने आदेश देऊनही पाणीपुरवठा विभागाने या भागाला शहरातील इतर वसाहतींप्रमाणे तीन दिवसाआड पाणी देण्याचे नियोजन केलेले नाही. दूषित पाण्याच्याही तक्रारी कायम आहेत. प्रशासनाला पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आदेश देण्याची मागणी करत सय्यद मतीन, अजीम खान यांच्यासह एमआयएमच्या नगरसेवकांनी सभापतींच्या डायससमोर ठिय्या आंदोलन सुरू केले. शिवसेना सदस्य राजू वैद्य यांनी एमआयएमच्या वक्तव्याची री ओढली. ते म्हणाले, पूर्ण शहरात पाणीपुरवठ्याच्या तक्रारी आहेत. पाणीपुरवठा विभाग कमी पडत आहे. चहल हे सक्षम अधिकारी नसून आजच्या आज त्यांचा पदभार काढून त्यांच्या जागी सक्षम अधिकारी द्यावा, नाही तर ही बैठक पुढे चालू न देण्याचा इशारा वैद्य यांनी दिला. सदस्य ऋषिकेश खैरे यांनीही चहल वारंवार फोन करूनही उत्तर देत नसल्याचा आरोप केला. सदस्या संगीता वाहुळे म्हणाल्या, पाण्यामुळे बैठकीत खाली बसण्याची वेळ आली. शिवसेनेचे आरोप आणि एमआयएमच्या ठिय्या आंदोलनामुळे गोंधळलेले सभापती बारवाल यांनी पंधरा मिनिटांसाठी बैठक तहकूब केली.
दालनातील चर्चेत मनधरणी
सभापती बारवाल यांनी बैठक तहकूब केल्यानंतर नगरसेवकांशी दालनात चर्चा करून मनधरणी केली. बैठक सुरू झाली तेव्हा चहल यांच्या बदलीवरून सर्वांनी यू-टर्न घेतला. राजू वैद्य, राजगौरव वानखेडे यांनी आयुक्तांशी चर्चा करून पाणी प्रश्नावर योग्य निर्णय घेण्याची मागणी केली. एमआयएमचे सदस्य म्हणाले, अधिकारी कोणताही असो. समान पाणीपुरवठा झाला पाहिजे. आयुक्तांना बैठकीत बोलावून जुन्या शहराला समान पाणी देण्याचे आदेश द्या, असे म्हणत एमआयएम सदस्यांनी पुन्हा ठिय्या दिला. त्यावर सभापतींनी आयुक्तांशी या मुद्यावर चर्चा करून तोडगा काढण्याचे आश्वासन दिले.

Web Title: Stage for water at Aurangabad Municipal 'Permanent' meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.