शिळी मिठाई तर तुमच्या माथी मारली जात नाही ना; ‘बेस्ट बिफोर’ लिहिण्यास टाळाटाळ

By प्रशांत तेलवाडकर | Published: May 30, 2024 07:34 PM2024-05-30T19:34:58+5:302024-05-30T19:35:22+5:30

मिठाईसमोर बेस्ट बिफोर लिहीत नाही, अशा मिठाई विक्रेत्यांवर कारवाई करण्याचे अधिकार अन्न व औषध प्रशासनाकडे दिले आहेत.

Stale sweets are in your plate; many shopkeeper avoid writing 'best before' | शिळी मिठाई तर तुमच्या माथी मारली जात नाही ना; ‘बेस्ट बिफोर’ लिहिण्यास टाळाटाळ

शिळी मिठाई तर तुमच्या माथी मारली जात नाही ना; ‘बेस्ट बिफोर’ लिहिण्यास टाळाटाळ

छत्रपती संभाजीनगर : तुम्ही खातात ती मिठाई किती शुद्ध आहे किंवा कधी तयारी केली व किती दिवसांत खावी, याचा विचार केला आहे का? त्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने मिठाईच्या ट्रेसमोर ‘बेस्ट बिफोर’ तारीख लिहिण्याची सक्ती केली होती. मात्र, शहरातील सुमारे ७० टक्के मिठाई विक्रेत्यांनी आता मिठाईसमोर ‘बेस्ट बिफोर’ देणे टाळणे सुरू केले आहे. यामुळे तुमच्या माथी शिळी मिठाई तर मारली जात नाही ना, अशी शंका निर्माण झाली आहे.

चार वर्षांत नियम धाब्यावर
भारतीय अन्नसुरक्षा आणि मानक प्राधिकरण (एफएसएसएआय)ने २५ सप्टेंबर २०२० ला यासंदर्भात आदेश काढला होता. १ ऑक्टोबर २०२० पासून दुकानात मिठाईच्या ट्रेसमोर ‘बेस्ट बिफोर’ तारीख लिहिणे बंधनकारक करण्यात आले होते. ‘बेस्ट’ म्हणजे मिठाई कधी तयार केली आणि ‘बिफोर’ म्हणजे ती मिठाई किती दिवस खाऊ शकतात, असा याचा अर्थ होतो. त्यानंतर काही दिवस विक्रेत्यांनी या आदेशाचे पालन केले. लाॅकडाऊननंतरही काही महिने मिठाईसमोर बेस्ट बिफोर लिहिले जात होते; पण अन्न व औषध प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आणि अनेक मिठाई विक्रेत्यांनी नियम धाब्यावर बसवत बेस्ट बिफोर लिहिणे बंद केले.

नामांकित ३० टक्के दुकानांतच पालन
शहरात आजघडीला १५० पेक्षा अधिक लहान-मोठे मिठाईची दुकाने आहेत. यातील ३० टक्के तेही नामांकित दुकानदारच मिठाईच्या ‘ट्रे’समोर ‘बेस्ट बिफोर’ लिहीत असल्याचे आढळून आले आहे. त्यातही २ टक्के मिठाई विक्रेत्यांनी ट्रेसमोर मिठाईचे नाव व त्याखाली किंमत आणि बिफोर तारीख असे लिहिलेले आढळून आले.

अन्न व औषध विभागाच्या दुर्लक्षामुळे संभ्रम
मिठाईसमोर बेस्ट बिफोर लिहीत नाही, अशा मिठाई विक्रेत्यांवर कारवाई करण्याचे अधिकार अन्न व औषध प्रशासनाकडे दिले आहेत. मात्र, या विभागाने सुरुवातीच्या काळात दंडात्मक कारवाई केली. पण नंतर विभागाचे दुर्लक्ष झाले. मनुष्यबळ कमी असल्याने दुर्लक्ष झाले. याचा वेगळा अर्थ मिठाई विक्रेत्यांनी घेतला व आता बेस्ट बिफोरचा निर्णय बदलला असाच सोयीचा अर्थ काढला. यामुळे संभ्रम निर्माण झाला. पण आदेश कायम आहेत. यामुळे जिथे बेस्ट बिफोर लिहिले तीच मिठाई खरेदी करा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

कोणती मिठाई किती दिवस टिकते
१) दुधापासून बनविलेला पेढा २ दिवस
२) अधिक साखर टाकलेला पेढा १० दिवस
३) बेसनापासून तयार केलेली मिठाई, मोतीचूर लाडू, बेसन लाडू, म्हैसूरपाक, सोनपापडी-१५ दिवस
४) खव्यापासून बनविलेले कंदीपेढे, केशरी पेढे, चाॅकलेट बर्फी, गुलकंद बर्फी- ६ ते ७ दिवस
५) दुधापासून बनविलेले मिल्क केक, कलाकंद, अंजीर बर्फी, रसमलाई, रबडी- २ दिवस
६) ड्रायफ्रुट मिठाई, काजू कतली, काजू रोल, ड्रायफ्रुट बर्फी- ७ ते ८ दिवस

Web Title: Stale sweets are in your plate; many shopkeeper avoid writing 'best before'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.