स्थायी समिती निष्क्रिय
By Admin | Published: February 18, 2016 11:53 PM2016-02-18T23:53:41+5:302016-02-19T00:02:05+5:30
औरंगाबाद : स्थायी समितीच्या गुरुवारच्या बैठकीत एमआयएमच्या सदस्यांनी पालिका प्रशासनाच्या निष्क्रियतेवर बोट ठेवून थेट सभापतींवरच शरसंधान साधले.
औरंगाबाद : स्थायी समितीच्या गुरुवारच्या बैठकीत एमआयएमच्या सदस्यांनी पालिका प्रशासनाच्या निष्क्रियतेवर बोट ठेवून थेट सभापतींवरच शरसंधान साधले. नऊ महिन्यांच्या काळात बैठकीत एकही प्रश्न निकाली निघाला नाही. तुमच्या आदेशांचेही पालन होत नाही. मग आम्ही बैठकांना यायचे कशाला, असा सवाल या सदस्यांनी सभापतींना केला. एका सदस्याने सभापतीच अधिकाऱ्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप केला. यामुळे बैठकीत चांगलीच खडाजंगी होऊन गोंधळ उडाला.
सदस्यांच्या नाराजीनंतर शेवटी सभापती दिलीप थोरात यांनी आतापर्यंतच्या बैठकीत दिलेल्या आदेशांवर प्रशासनाने कोणती कारवाई केली याचा अहवाल सादर करण्याचे आदेश प्रशासनाला दिले. बैठकीच्या सुरुवातीला नगरसेवक अब्दुल नाईकवाडी यांनी वॉर्डातील विकासकामांचा मुद्या उपस्थित केला़ त्यावर सभापती दिलीप थोरात यांनी कार्यकारी अभियंता अफसर सिद्दीकी आणि सिकंदर अली यांना खुलासा करण्यास सांगितले़ तेव्हा अधिकाऱ्यांनी कारवाई सुरू असल्याचे उत्तर दिले.
या खुलाशावर नाईकवाडी यांनी आक्रमक पवित्रा घेतला. वर्ष झाले आम्ही प्रश्न मांडत आहोत, पण ते निकाली निघत नाही. याआधीच्या बैठकीतही किती तरी वेळा सभापतींनी माझ्या वेगवेगळ्या प्रश्नांवर कारवाईचे आदेश दिले, पण त्यांचे आदेश प्रशासन गांभीर्याने घेत नाही. मग आम्ही बैठकीत प्रश्न मांडायचे की नाही? की विरोधकांचे प्रश्न सुटू नयेत म्हणून सभापती अधिकाऱ्यांना पाठीशी घालत आहेत? असे प्रश्न नाईकवाडी यांनी उपस्थित केले़ त्यावर सभापती थोरात यांनी विनाकारण आरोप करू नका, तुमचे म्हणणे मी नेहमीच ऐकून घेतो, त्याचा गैरफायदा घेऊ नका, असे सुनावले. या उत्तरानंतर नाईकवाडी यांनी सभापती साहेब, आजपर्यंत तुम्ही दिलेल्या एकाही आदेशाचे प्रशासनाने पालन केलेले नाही़ तुमच्या आदेशाचे पालन झाले नाही याचे माझ्याकडे पुरावे आहेत. यावरून स्थायी समितीच निष्क्रिय असल्याचा संदेश जात आहे, असा आरोप नाईकवाडी यांनी केला़ त्यामुळे दोघांमध्ये बराच वेळ खडाजंगी झाली.
एमआयएमचे नगरसेवक विकास एडके, नगरसेविका समीना शेख, शिवसेनेचे गजानन मनगटे, मकरंद कुलकर्णी यांनीही नाईकवाडी यांना साथ दिली. गजानन बारवाल आणि नितीन चित्ते यांनीही स्थायीच्या आदेशांचे पालन होत नसल्याचा मुद्दा उपस्थित केला. त्यामुळे कात्रीत सापडलेल्या सभापती थोरात यांनी प्रभारी आयुक्तांना आतापर्यंतच्या बैठकांमधील आदेशांवर कोणती कारवाई केली याचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.
सभागृहात शॉर्ट सर्किट
बैठक सुरू असतानाच स्थायी समिती सभागृहात शॉर्ट सर्किट झाले. अचानक छताच्या आतून धूर बाहेर येण्यास सुरुवात झाली. त्यानंतर लगेचच सभागृहातील सर्व विद्युत दिवे, पंखे बंद करण्यात आले. बैठकीवर मात्र त्याचा कोणताही परिणाम झाला नाही. या प्रकारानंतरही बैठक सुरूच होती.