नवरात्रोत्सवाला घटस्थापनेने प्रारंभ
By Admin | Published: October 2, 2016 01:03 AM2016-10-02T01:03:25+5:302016-10-02T01:03:25+5:30
परभणी : शनिवारी जिल्हाभरात घटस्थापनेने शारदीय नवरात्रोत्सवास प्रारंभ झाला. दिवसभर पावसाची रिपरिप असल्याने सार्वजनिक दुर्गा महोत्सव पदाधिकाऱ्यांची धांदल उडाली.
परभणी : शनिवारी जिल्हाभरात घटस्थापनेने शारदीय नवरात्रोत्सवास प्रारंभ झाला. दिवसभर पावसाची रिपरिप असल्याने सार्वजनिक दुर्गा महोत्सव पदाधिकाऱ्यांची धांदल उडाली. अनेक दुर्गा मंडळांनी सायंकाळी उशिरा दुर्गादेवींची प्रतिष्ठापणा केली.
जिल्ह्यात शनिवारपासून नवरात्रोत्सवाला प्रारंभ झाला आहे. परभणी शहरात सार्वजनिक दुर्गा मंडळांची स्थापना झाली असून मागील १५ दिवसांपासून नवरात्र उत्सवाची तयारी सुरु होती. शनिवारी सकाळपासूनच शहरात पाऊस होता. त्यामुळे दुर्गा देवीच्या सवाद्य मिरवणुका निघाल्या नाहीत. अनेक मंडळांनी पावसापासून बचाव व्हावा म्हणून दुर्गा देवींच्या मूर्ती मंडळ स्थळापर्यंत नेल्या. परभणी बाजारपेठेत पावसामुळे गर्दी कमी झाल्याचे दिसून आले.
जिल्हाभरात नवरात्र उत्सवाची जोरदार तयारी सुरु आहे. ठिकठिकाणी धार्मिक, मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित केले असून सजीव देखावेही उभारण्यात येत आहेत.
परभणी जिल्ह्यामध्ये ३१८ सार्वजनिक दुर्गा मंडळांची स्थापना झाली आहे. परभणी तालुक्यात सर्वाधिक २१७ दुर्गा मंडळांची नोंदणी झाली असून पालम तालुक्यात ७, पाथरी १०, पूर्णा २९, जिंतूर २५, गंगाखेड १५, सोनपेठ ६, मानवत ४ आणि सेलू तालुक्यामध्ये ५ दुर्गा मंडळांची नोंदणी सहाय्यक धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडे झाली आहे.
सार्वजनिक ठिकाणी दुर्गा देवींची प्रतिष्ठापणा करण्यासाठी आणि वर्गणी जमा करण्यासाठी सहाय्यक धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडे रितसर नोंदणी करण्याचे आवाहन या कार्यालयाने केले आहे.