बारावीच्या परीक्षेला शांततेत सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2019 09:41 PM2019-02-21T21:41:58+5:302019-02-21T21:42:31+5:30
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या बारावी परीक्षेला वाळूज महानगरात गुरुवारपासून शांततेत सुरुवात झाली. बजाजनगर व रांजणगावातील परीक्षा केंद्रावर इंग्रजीचा पहिला पेपर सुरळीत पार पडला.
वाळूज महानगर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या बारावी परीक्षेला वाळूज महानगरात गुरुवारपासून शांततेत सुरुवात झाली. बजाजनगर व रांजणगावातील परीक्षा केंद्रावर इंग्रजीचा पहिला पेपर सुरळीत पार पडला. रांजणगावातील एका परीक्षा केंद्रावर बसण्यासाठी डेस्कची व्यवस्था नसल्याने परीक्षार्थींना जमिनीवर बसून पेपर सोडवावा लागला. या प्रकारामुळे परिक्षार्थिंची गैरसोय झाली.
बारावीच्या प्रात्याक्षिक परीक्षा संपल्यानंतर गुरुवारपासून लेखी परीक्षेला सुरुवात झाली. इंग्रजीचा पहिलाच विषय असल्याने हॉलतिकीट घेवून वाळूज महानगरातील परीक्षा केंद्रांवर सकाळी १० वाजेपासूनच परिक्षार्थींनी पालकांसह गर्दी केली होती. साडेदहा वाजता सर्व विद्यार्थ्यांना गेटच्या आतमध्ये प्रवेश देण्यात आला. केंद्र संचालक व पर्यवेक्षकांनी झाडाझडीत घेत हॉलतिकीट तपासून विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी हॉलमध्ये सोडले जात होते.
परिसरातील बजाजनगर, सिडको वाळूज महानगर, रांजणगाव, जोगेश्वरी, पंढरपूर, वाळूज, तीसगाव आदी भागांतील विद्यार्थ्यांनी या केंद्रावर परीक्षा दिली. कॉपीमुकत परीक्षा पार पडावी यासाठी केंद्रावर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.