पुतळ्यावर १ कोटी खर्च करण्याऐवजी सैनिक शाळा सुरू करा : इम्तियाज जलील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2022 02:52 PM2022-01-22T14:52:16+5:302022-01-22T14:53:02+5:30
खासदार इम्तियाज जलील यांची पालकमंत्र्यांकडे मागणी
औरंगाबाद : सिडको कॅनॉट परिसरामध्ये महाराणा प्रताप यांचा पुतळा उभारण्यासाठी १ कोटी रुपये खर्च करण्याऐवजी त्यांच्या नावाने ग्रामीण भागातील युवक व युवतींना राष्ट्रीय सेवेसाठी सैनिक शाळा सुरू करण्याची मागणी खा. इम्तियाज जलील यांनी पालकमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे केली आहे. तसेच जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, मनपा प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांना योग्य ती कार्यवाही करणेबाबत पत्राद्वारे कळविले आहे.
पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या अध्यक्षतेखाली मागील महिन्यात झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आ. अतुल सावे, अंबादास दानवे यांनी सिडको कॅनॉट परिसरामध्ये महाराणा प्रताप यांचा पुतळा उभारण्याच्या कामास सुरुवात करण्याची मागणी केली होती. बैठकीतच त्यांच्या मागणीला जलील यांनी विरोध करून पुतळा उभारणीवर खर्च करण्यात येणाऱ्या निधीतून ग्रामीण भागातील युवक व युवतींना राष्ट्रीय सेवेसाठी सैनिक शाळा सुरु करण्याची मागणी केली होती. यासंबंधी पत्राद्वारे आज मागणी केली.
जलील यांनी पालकमंत्री सुभाष देसाई, जिल्हाधिकारी व मनपा प्रशासक यांना दिलेल्या पत्रात नमूद केले की, महाराणा प्रताप उदयपूर, मेवाड येथील शिशोदिया घराण्याचे महान राजा होते. त्यांच्या शौर्यामुळे आणि दृढनिश्चयामुळे त्यांचे नाव इतिहासाच्या पानावर अजरामर आहे. ते लहानपणापासूनच शूर, निर्भय, स्वाभिमानी आणि स्वातंत्र्यप्रेमी होते. अनेक युद्धांत त्यांनी पराक्रम दाखवून शत्रूंवर विजय प्राप्त केलेला आहे. अशा थोर, महान शूरवीर महाराणा प्रताप यांचा पुतळा उभारुन काहीही साध्य होणार नाही. महाराणा प्रताप यांच्या प्रती खरा आदर व सन्मान सैनिकी शाळाच असेल; कारण त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन ग्रामीण भागातील युवक व युवती सैनिक शाळेतून देश संरक्षणासाठी प्रशिक्षण घेतील. सैनिक शाळेमधून शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना लष्कर, हवाई दल आणि नौदलात नोकरी उपलब्ध होईलच तसेच विविध इतर शासकीय आणि खासगी क्षेत्रामध्येसुद्धा रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.