रांजणगावात स्वतंत्र डाक-घर कार्यालय सुरु करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2019 12:12 AM2019-06-09T00:12:39+5:302019-06-09T00:12:52+5:30
गावात स्वतंत्र डाक-घर कार्यालय सुरु करावे. अशी मागणी ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच संजिवीनी सदावर्ते यांनी डाक विभागाचे प्रवर अधिक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
वाळूज महानगर: वाळूज औद्योगिक क्षेत्रातील रांजणगाव हे सर्वाधिक लोकसंख्या असलेले गाव असूनही डाक-घर कार्यालय उपलब्ध नाही. गावातील सुशिक्षित तरुणांसह नागरिकांची पत्र व्यवहार तसेच विविध कामासाठी गैरसोय होत आहे. त्यामुळे गावात स्वतंत्र डाक-घर कार्यालय सुरु करावे. अशी मागणी ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच संजिवीनी सदावर्ते यांनी डाक विभागाचे प्रवर अधिक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
वाळूज उद्योनगरीतील सर्वात मोठे गाव म्हणून रांजणगावची ओळख आहे. २०११ च्या जणगणनेनुसार गावची लोकसंख्या ४२ हजार ८७७ एवढी आहे. राज्यासह परराज्यातील अनेक कामगार येथे स्थायिक झाल्याने आज घडीला गावची लोकसंख्या एक लाखाच्या वर गेली आहे. मात्र येथील रहिवाशांना पत्र व्यवहार, आर्थिक व्यवहार करण्यासाठी डाकघर कार्यालय नाही. यासाठी गत ३० वर्षापासून मागणी केली जात आहे. मात्र संबंधित विभागाकडून या मागणीकडे कानाडोळा केला जात आहे.
गावात डाकघर कार्यालय नसल्याने या कार्यालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या शासनाच्या विविध कल्याणकारी योजनेपासून नागरिकांना वंचित रहावे लागत आहे. तसेच येथील रहिवाशांना डाकघर कार्यालयाशी निगडीत असलेल्या प्रत्येक कामासाठी बजाजनगर किंवा शहरात जावे लागत आहे. येथील अनेक सुशिक्षित तरुण विविध स्पर्धा परीक्षेची तयारी करतात. मात्र डाकघर कार्यालय अभावी त्यांना बाहेरगावी नोकरी संदर्भात अर्ज पाठविणे तसेच बाहेर गावाहून येणारे महत्वाची कागदपत्र वेळेवर मिळत नाहीत. त्यामुळे बºयाचदा तरुणाच्या नोकरीच्या संधी हुकत आहेत. तरुणांसह नागरिकांची गैरसोय लक्षात घेवून ग्रामपंचायतीने गावात स्वतंत्र डाकघर कार्यालय सुरु करण्याची मागणी केली आहे. शिवाय या कार्यालयासाठी जागा देण्याची तयारीही दर्शविली आहे.
दरम्यान गेल्या ३० वर्षापासून डाकघर कार्यालय सुरु करण्याची ग्रामस्थांकडून मागणी केली जात आहे. एक लाखाच्या वर गावची लोकसंख्या असून गावात डाकघर कार्यालयाची सुविधा नाही. त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसो होत आहे. त्यामुळे डाकघर कार्यालय सुरु करण्याची मागणी संबंधित प्रवर अधिकारी यांच्याकडे केली आहे. कार्यालयासाठी जागा देण्यास ग्रामपंचायत तयार आहे. असे सरपंच संजिवीनी दीपक सदावर्ते यांनी सांगितले.