राज्य हौशी हिंदी नाटक स्पर्धेला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2018 01:02 AM2018-02-06T01:02:20+5:302018-02-06T01:02:22+5:30
राज्य सांस्कृतिक संचालनालयाच्या ५७ व्या हिंदी राज्य नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीला सोमवारी (दि.५) सुरुवात झाली असून, ज्येष्ठ रंगकर्मी डॉ. शशिकांत ब-हाणपूरकर यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : राज्य सांस्कृतिक संचालनालयाच्या ५७ व्या हिंदी राज्य नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीला सोमवारी (दि.५) सुरुवात झाली असून, ज्येष्ठ रंगकर्मी डॉ. शशिकांत ब-हाणपूरकर यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. तापडिया नाट्यमंदिरात पार पडलेल्या या कार्यक्रमाला सांस्कृतिक संचालनालयाच्या अधिकारी नीलिमा लोणे, समीक्षक डॉ. ऋषिकेश कांबळे, डॉ. मुस्तजिब खान, परीक्षक माधुरी दातार, डॉ. किशोर शिरसाठ आणि महेश पाटील आदी उपस्थित होते.
हिंदी नाटकांचे नाट्यक्षेत्रातील स्थान विशद करताना डॉ. ब-हाणपूरकर यांनी राज्यात हिंदी नाटकांचे प्रमाण वाढविण्यावर जोर दिला. कलाकारांनी केवळ मराठी नाटकांमध्ये अडकून न पडता हिंदी नाटकांमध्येही प्रयोग करण्याचा त्यांनी सल्ला दिला. मराठी व हिंदी नाटकांची तुलना करताना डॉ. कांबळे म्हणाले की, ज्याप्रमाणे हिंदी रंगभूमीने सतत विकसनशील भूमिका ठेवत चौकटी मोडण्याचा प्रयत्न केला त्याप्रमाणे मराठी नाटकांनीदेखील ठराविक साच्यातून बाहेर पडावे. रसिकांना हिंदी नाटकांचा आस्वाद घेण्याचे डॉ. खान यांनी आवाहन केले.
स्पर्धेच्या पहिल्या दिवशी दिनेश सिंह लिखित ‘केस नंबर अलां फलां’ हे नाटक सादर झाले. मुस्लिम समाजाविषयी एकंदर दृष्टिकोन व त्यातून उद्भवणा-या समस्या यांचा ऊहापोह या नाटकातून करण्यात आला. नवी मुंबईच्या यवनिका थिएटर्सने या नाटकाची निर्मिती केली. स्पर्धेच्या निमित्ताने ५ फेब्रुवारी ते २२ मार्चदरम्यान एकूण ७२ हिंदी नाटकांची रसिकांसाठी पर्वणी आहे.