राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेस थाटात प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2017 01:17 AM2017-10-28T01:17:28+5:302017-10-28T01:17:33+5:30
अ. मराठी बुध्दिबळ संघटना व जिल्हा बुध्दिबळ संघ जालनाच्या वतीने स्व. चरण पहेलवान भक्त यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ शहरातील एका हॉटेलमध्ये ३१ वी राज्यस्तरीय बुध्दिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या हस्ते शुक्रवारी सकाळी या स्पर्धेचे उद्घाटन झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : अ. मराठी बुध्दिबळ संघटना व जिल्हा बुध्दिबळ संघ जालनाच्या वतीने स्व. चरण पहेलवान भक्त यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ शहरातील एका हॉटेलमध्ये ३१ वी राज्यस्तरीय बुध्दिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या हस्ते शुक्रवारी सकाळी या स्पर्धेचे उद्घाटन झाले.
अध्यक्षस्थानी म्हणून माजी आ. कैलास गोरंट्याल तर प्रमुख पाहुणे म्हणून अ. मराठी बुध्दिबळ संघटनेचे कार्याध्यक्ष विजय देशपांडे, छत्रपती पुरस्कार प्राप्त जयंत गोखले, मनीष बगडिया, भाऊसाहेब घुगे, अभिमन्यू खोतकर, संतोष मोहिते यांची उपस्थिती होती.
मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन करून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. राज्यमंत्री खोतकर म्हणाले, की स्व. चरण पहेलवान भक्त यांनी जालना जिल्ह्यामध्ये जिल्हा बुध्दिबळ व तालीम संघाची स्थापना करुन जिल्ह्यातील खेळाडूंना बुद्धी आणि शक्तीचे धडे दिले. जिल्ह्यात २५ वषार्नंतर त्याचे पुत्र प्राचार्य डॉ. दयानंदजी भक्त यांनी राज्यस्तरीय बुध्दिबळ स्पर्धा आयोजित केल्याने जिल्ह्यातील बुध्दिबळ खेळाडूंमध्ये उत्साहाचे वातावरण तयार झाले आहे. राज्यभरातून आलेल्या खेळाडूंना पुढील राष्ट्रीय स्पर्धेसाठी खोतकर यांनी शुभेच्छा दिल्या. माजी आ. गोरंट्याल यांनी या उपक्रमाचे कौतुक करून खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. यावेळी बुद्धिबळ पटावर खोतकर व गोरंट्याल यांनी मॅच खेळून स्पर्धेला सुुरुवात केली.
राज्यभरातून या स्पर्धेला चांगला प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेस २१० खेळाडूंनी नोंदणी केली असून, यात ६० आंतरराष्ट्रीय मानांकनप्राप्त खेळाडूंचा सहभाग आहे. या स्पर्धेत यजमान जालन्यासह औरंगाबाद, परभणी, नांदेड, लातूर, हिंगोली, उस्मानाबाद, बीड, अकोला, अमरावती, बुलडाणा, वाशिम, भंडारा, गोंदिया, नागपूर, चंद्रपूर, मुंबई, ठाणे, पालघर, पुणे, नाशिक, अहमदनगर, जळगाव, नंदूरबार, धुळे, रायगड, सांगली, सातारा, कोल्हापुर, सोलापूर, रत्नागिरी या जिल्ह्यांतील ११ वर्षांखालील मुले व मुलींचे संघ सहभागी झाले आहेत. पाच दिवस चालणाºया या साखळी पध्दतीच्या स्पर्धेतून निवडले जाणारे २ मुले व ५ मुली यांची ११ वषार्खालील राष्ट्रीय स्पधेर्साठी महाराष्ट्राच्या संघात निवड केली जाणार आहे.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जिल्हा बुध्दिबळ संघाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. दयानंद भक्त यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य पंच शोभराज खोंडे (नंदूरबार), प्रा. डॉ. आत्मानंद भक्त, जिल्हा बुध्दिबळ संघाचे सचिव प्रा. डॉ. रत्नाकर कुलकर्णी, सतीश ठाकुर, प्रा. डॉ. शाम काबुलीवाले, प्रा. डॉ. भिकूलाल सले, गोपाल काबलिये, भैयालाल कडपे, प्रा. गजानन जगताप, प्रा. साहेबराव बनसोड हे परिश्रम घेत आहेत. सहायक पंच म्हणून अभिजित वैष्णव, अमरीश जोशी, केशव लहाने, केदार कल्याणकर, दीपक कुमठाकर, नंदलाल बठेजा, प्रशांत नवगिरे, विनोद कदम हे काम पाहत आहेत.