१५ दिवसांत शिक्षक भरती प्रक्रिया सुरु करा; विद्यार्थी संवादातून रोहित पवारांचा सरकारला इशारा
By राम शिनगारे | Published: August 16, 2023 06:29 PM2023-08-16T18:29:19+5:302023-08-16T18:30:12+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीच्या हिरवळीवर रोहित पवार यांनी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला
छत्रपती संभाजीनगर : शिक्षक भरतीसाठी येत्या काही दिवसात संबंधित मंत्र्यांची भेट देऊन भरतीप्रक्रिया सुरू करण्यासाठी १५ दिवसाची मुदत दिली जाईल. त्यानंतरही भरतीला सुरुवात न झाल्यास विद्यापीठ ते जिल्हाधिकारी कार्यालय असा बेरोजगार युवकांचा विराट मोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणा राष्ट्रवादीचे आ. रोहित पवार यांनी केली. निमित्त होते विद्यापीठात आयोजित विद्यार्थी संवाद कार्यक्रमाचे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीच्या हिरवळीवर आज दुपारी अधिसभा सदस्य डॉ. नरेंद्र काळे, प्रा. शेख जहुर, प्रा. बंडू सोमवंशी, विद्यापरिषद सदस्य डॉ. राजेश करपे यांनी ' विद्यार्थी संवाद' कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी एमपीएससी आयोगाच्या परीक्षा, विविध विभागातील भरतीसाठी टीसीएस, आयबीपीएस संस्थांकडून घेण्यात येणारे परीक्षा शुल्क, सारथी, बार्टी आणि महाज्योती या संस्थांकडून संशोधक विद्यार्थ्यांची होणाऱ्या कोंडीवर विविध विद्यार्थ्यांनी प्रश्नांची बरसात केली. यात परमेश्वर माने, महेंद्र मुंढे, धर्मराज जाधव, डॉ. गणेश बडे आदींनी समस्या मांडल्या. परमेश्वर माने याने परीक्षा शुल्काचा मुद्दा उपस्थित करीत विद्यार्थ्यांची होणारी लुट थांबविण्याची मागणी केली. तर डॉ. गणेश बडे यांनी प्राध्यापक, शिक्षकांची १०० टक्के भरतीची मागणी केली.
विद्यार्थ्यांच्या मुद्यांवर बोलताना आ. रोहित पवार यांनी विधिमंडळाच्या अधिवेशनात स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या युवकांच्या मागण्याकडे लक्ष वेधल्याचे सांगितले. तसेच टीसीएसकडून १ हजार रुपयांचे आकारण्यात येणारे शुल्क कमी करण्यासाठी लढा उभारणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर, डॉ. राम चव्हाण, विठ्ठल गडदे, प्रा. अमोल औटे, दीपक सांळुके, डॉ. विश्वनाथ कोक्कर, डॉ. विनय लोमटे, डॉ. ह. नी. सोनकांबळे, डॉ. दीपक बहीर, अजय पवार आदींची उपस्थिती होती.
आश्वासनांच्या पुर्ततेसाठी कायदा हवा
विद्यार्थी, युवकांच्या आंदोलन, उपोषणावेळी वेगवेगळे मंत्री, आमदार, राजकीय नेते विविध आश्वासने देऊन माघार घेण्यास भाग पाडतात. त्यानंतर त्या मागणीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले जाते. मंत्र्यासह इतरांनी दिलेल्या आश्वासनांच्या पुर्ततेसाठी विधिमंडळात कायदा करा, त्यामुळे बेरोजगारांची होणारी फसवणूक थांबेल अशी मागणीच युवकांनी आ. रोहित पवार यांच्याकडे केली.