वाळूज-ब्रह्मगव्हाण रस्ता रुंदीकरणास प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2019 11:08 PM2019-04-08T23:08:30+5:302019-04-08T23:08:38+5:30
एमआयडीसी प्रशासनाकडूनपैठण तालुक्यातील ब्रह्मगव्हाण ते वाळूज या रस्त्याच्या रुंदीकरण व डांबरीकरणास प्रारंभ झाला आहे.
वाळूज महानगर : एमआयडीसी प्रशासनाकडूनपैठण तालुक्यातील ब्रह्मगव्हाण ते वाळूज या रस्त्याच्या रुंदीकरण व डांबरीकरणास प्रारंभ झाला आहे. दुसऱ्या टप्प्यातील या रस्त्याचे रुंदीकरण व डांबरीकरणासाठी ९ कोटींचा निधी खर्च केला जाणार असून, या मार्गावरील २० गावांतील दळण-वळण यंत्रणाही सुरळीत होण्यास मदत होणार आहे.
महाराष्टÑ औद्योगिक विकास महामंडळाकडून वाळूज औद्योगिकनगरीत कारखाने तसेच नागरी वसाहतीत पाणी पुरवठा करण्यात येतो. पैठण येथील जायकवाडी जलाशयातून जलवाहिनी टाकुन हे पाणी उद्योगनगरीत आणले जाते. उद्योनगरीत पाणी आणण्यासाठी पैठण तालुक्यातील ब्रह्मगव्हाण येथे पंप हाऊस उभारले असून, या पंप हाऊसमधून जलवाहिनीद्वारे उद्योनगरीत पाणी आणले जाते. जायकवाडीच्या जलाशयातुन आलेले पाणी बजाज आॅटो कंपनीजवळ असलेल्या जलशुद्धीकरण केंद्रात पाणी शुद्ध करण्यात येते. या जलशुद्धीकरण केंद्रात शुद्ध झालेले पाणी वाळूज औद्योगिक परिसरातील कारखाने तसेच बजाजनगर, सिडको वाळूजमहानगर तसेच स्थानिक ग्रामपंचायतींना पुरविण्यात येतो.
ब्रह्मगव्हाण येथुन वाळूजपर्यंत टाकलेल्या जलवाहिनीची देखभाल व दुरुस्ती तसेच पंपहाऊसवर तांत्रिका बिघाड झाल्यास तात्काळ उपाययोजना करुन पाणी पुरवठा सुरळीत व्हावा, यासाठी एमआयडीसी प्रशासनाने १८ किलोमिटरचा स्वतंत्र पक्का डांबरी रस्ता तयार केला आहे. दरम्यानच्या कालावधीत या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाल्यामुळे ब्रह्मगव्हाणच्या पंपहाऊसपर्यय ये-जा करण्यासाठी एमआयडीसीचे अधिकारी व कर्मचाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत होती. त्यामुळे एमआयडीसी प्रशासनाच्यावतीने या रस्त्याचे रुंदीकरण व डांबरीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. सन २०१६ मध्ये लांझी फाट्यापासून जवळपास ६ किलोमीटर रस्त्याचे रुंदीकरण व डांबरीकरणाचे काम पूर्ण करण्यात आले आहे.