रोहयोची कामे याच महिन्यात सुरू करा, दिरंगाई करणाऱ्यांची गय करणार नाही: संदीपान भुमरे
By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2022 11:53 AM2022-12-06T11:53:29+5:302022-12-06T11:53:50+5:30
विभागातील सर्व जिल्ह्यांनी शासनाने रोहयोअंतर्गत कुशल व अकुशल कामांचा दिलेला निधी खर्च करून उर्वरित कामे तातडीने पूर्ण करावीत.
औरंगाबाद : रोजगार हमी योजनेतील मंजूर काम डिसेंबरअखेर सुरू करून विभागाने दिलेला लक्ष्य प्रत्येक जिल्ह्यांनी पूर्ण करण्याचे आदेश पालकमंत्री, रोजगार हमी व फलोत्पादनमंत्री संदीपान भुमरे यांनी सोमवारी विभागीय आढावा बैठकीत दिले. आठही जिल्ह्यांतील रोहयोचे उपजिल्हाधिकारी; तसेच संबंधित अधिकारी बैठकीला उपस्थित होते.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीला रोहयो सचिव नंदकुमार, जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विकास मीणा, उपायुक्त रोहयो समीक्षा चंद्राकार यांच्यासह गटविकास अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
मातोश्री पाणंद रस्त्याची कामे पूर्ण करून ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांना शेतीसाठी रस्ता द्यावा. विशेषत: अंबड व घनसावंगी (जि. जालना) या तालुक्यांतील शेतकऱ्यांनी शेतरस्त्यासाठी वारंवार मागणी केलेली आहे. ती पूर्ण करण्यासाठी गटविकास अधिकारी, उपजिल्हाधिकारी यांनी कालबद्ध कार्यक्रम आखावा. अन्यथा डिसेंबरनंतर संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेश भुमरे यांनी दिले. विभागातील सर्व जिल्ह्यांनी शासनाने रोहयोअंतर्गत कुशल व अकुशल कामांचा दिलेला निधी खर्च करून उर्वरित कामे तातडीने पूर्ण करावीत. सामूहिक, वैयक्तिक विहीर, शोषखड्डे, पाणंद रस्ते, वृक्षलागवड, घरकुल बांधणी या कामांची बैठकीत उजळणी करण्यात आली.
दिरंगाई करणाऱ्यांची गय करणार नाही
डिसेंबरअखेरपर्यंत रोहयोची कामे सुरू न केल्यास अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा सचिव नंदकुमार यांनी दिला. रोहयोच्या कामात दिरंगाई करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असेही त्यांनी नमूद केले. शेतकरी व गरीब दुर्बलांचे आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी राज्यात रोजगार हमी योजना राबविली जात आहे. यामध्ये उपजीविकेसोबत शिक्षण, आरोग्य, राहणीमान व आर्थिक प्रगती यासाठी रोहयोची अंमलबजावणी प्रशासकीय यंत्रणेने प्रामाणिकपणे करावी, असे आवाहनही त्यांनी केले.