१९६० साली ८३ विद्यार्थ्यांनी सुरुवात; आतापर्यंत घडविले उच्च दर्जाचे १६ हजार अभियंते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2020 06:13 PM2020-01-23T18:13:42+5:302020-01-23T18:34:55+5:30
सुरुवातीला मिळाली तीन शाखांना मंजुरी..येथून बाहेर पडलेल्या अभियंत्यांनी विविध क्षेत्रांत आपल्या कार्यशैलीचा अमीट ठसा उमटविला. हीरक महोत्सवानिमित्त ‘लोकमत’ने जागविलेल्या या आठवणी...
- राम शिनगारे
औरंगाबाद : शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय (जिका) १९६० साली अवघ्या तीन शाखा आणि ८३ विद्यार्थ्यांवर सुरू झाले होते. आता महाविद्यालयाचा वटवृक्ष झाला असून, तब्बल १६ हजारांपेक्षा अधिक उत्कृष्ट अभियंते घडविण्याचे काम केले आहे. या महाविद्यालयात शिक्षण घेऊन अभियांत्रिकी शिक्षणाचा प्रसार करण्याचे कामही याच महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी केले आहे. तीन विभागांवर सुरूझालेल्या या महाविद्यालयात पदवी, पदव्युत्तर आणि पीएच.डी.चे २ हजारपेक्षा अधिक विद्यार्थी आता शिक्षण घेत आहेत.
हैदराबाद राज्यात असलेला मराठवाडा १९५७ साली विनाअट संयुक्त महाराष्ट्रात सामील झाला. तेव्हा मराठवाड्यात शिक्षणाचे बीजारोपण व्हावे, यासाठी आग्रही मागणी पुढे आली. तेव्हा विद्यापीठ स्थापन करण्याची मागणी जोर धरूलागली. मात्र, विद्यापीठ स्थापन करण्याएवढी महाविद्यालये मराठवाड्यात नव्हती. तरीही मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी औरंगाबादेत मराठवाडा विद्यापीठ स्थापन करण्याची घोषणा केली. त्यानुसार २३ आॅगस्ट १९५८ रोजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते विद्यापीठाचे उद्घाटन झाले.
शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाने केली मराठवाड्याच्या विकासाची पायाभरणी
तेव्हा मराठवाड्यात अवघी ९ महाविद्यालये होती. यात कला, वाणिज्य आणि विज्ञान या पारंपरिक शाखांचे शिक्षण देणारी ५ महाविद्यालये आणि कृषी, वैद्यकीय, विधि व अध्यापक या अभ्यासक्रमांची चार महाविद्यालये कार्यरत होती. अभियांत्रिकीचे शिक्षण देणारे एकही महाविद्यालयात मराठवाड्यात नव्हते. तेव्हा मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी औरंगाबादेत १९६० साली शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करण्याची घोषणा केली. यानुसार औरंगाबादेत अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू झाले. तेव्हा तीन वर्षांचा अभ्यासक्रम होता. पहिल्या वर्षी सिव्हिल, इलेक्ट्रिकल आणि मॅकेनिकल तीन विभागांना मान्यता मिळाली. यात अनुक्रमे ६०, ३०,३० असे एकूण १२० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. मात्र सिव्हिल अभ्यासक्रमाच्या ६० जागांपैकी केवळ २३ जागांवरच विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. या २३ विद्यार्थ्यांमध्ये मराठवाड्यातील आठ विद्यार्थ्यांचा समावेश होता.
'जीका'तील अभियंत्यांचा राजकारणाकडे नव्हे; व्यवसाय, उद्योग, नोकरीकडे ओढा
१९८६ साली तत्कालीन प्राचार्यांनी पार्टटाईम कोर्स वर्क सुरूकेला. तसेच याचवर्षी इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटर सायन्स या दोन नव्या विभागांना मान्यता मिळाली. त्या अभ्यासक्रमांना प्रत्येक ६० विद्यार्थी शिक्षण घेऊ शकत होते. पुढे २००० साली इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी हा नवीन विभाग मंजूर झाला. यालाही ६० विद्यार्थी एवढी संख्या होती. महाविद्यालयात सिव्हिल, इलेक्ट्रिकल, मॅकेनिकल, इलेक्ट्रॉनिक्स, क ॉम्प्युटर सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी हे सहा पदवी अभ्यासक्रम सुरू आहेत. २००४ साली महाविद्यालयात ७ विषयांत पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्यास मंजुरी मिळाली. विद्यमान स्थितीत ६ पदवी, ७ पदव्युत्तर, एमसीए, पीएच.डी. या अभ्यासक्रमांना २ हजारपेक्षा अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. पीएच.डी. संशोधनाचे संशोधन केंद्र म्हणूनही महाविद्यालयाला मान्यता मिळालेली असून,यात राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील विद्यार्थी संशोधन करीत असल्याची माहिती प्राचार्य डॉ. पी.बी. मुरनाळ यांनी दिली.