‘एसईबीसी’च्या जात प्रमाणपत्रांसाठी अर्ज घेण्यास सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2018 06:10 PM2018-12-11T18:10:13+5:302018-12-11T18:11:01+5:30
सॉफ्टवेअर अपडेट नसल्यामुळे ‘एसईबीसी’ प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र मिळण्यात तांत्रिक अडचणी होत्या.
औरंगाबाद : महाराष्ट्र अधिनियम क्र.६२ अन्वये मराठा समाजासाठी सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास (एसईबीसी) प्रवर्गाकरिता जात प्रमाणपत्र व पडताळणीची कार्यपद्धत तसेच पडताळणीच्या नमुन्यांचा अध्यादेश शासनाने जारी केला आहे. मात्र, जिल्हाधिकारी कार्यालयातील सेतू सुविधा केंद्रातील सॉफ्टवेअर अपडेट नसल्यामुळे ‘एसईबीसी’ प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र मिळण्यात तांत्रिक अडचणी होत्या. त्या अडचणी सोमवारी दूर करण्यात आल्या असून मंगळवारपासून जात प्रमाणपत्रांसाठी अर्ज स्वीकारले जाणार असल्याची माहिती सेतू संचालकांनी दिली.
शासनाने दिलेल्या सूचनांनुसार जात प्रमाणपत्रांसाठी आॅनलाईन फॉर्मेट आहे, त्यामध्ये एसईबीसीच्या प्रमाणपत्रांचा डाटा अपलोड करावा लागेल. सेतू सुविधा केंद्रात सध्या ओबीसी, एससी, एसटी, एनटी, व्हीजेएनटी, एसबीसी या प्रवर्गांचे जात प्रमाणपत्र देण्यात येते, तर याच प्रवर्गांचे प्रमाणपत्र पडताळणी संशोधन समितीकडून केले जाते. त्यात आता ‘एसईबीसी’ची भर पडणार आहे. मराठा समाजाला सामाजिक, शैक्षणिक आरक्षण देण्याबाबत शासनाने हिवाळी अधिवेशनात निर्णय घेतला. त्यानुसार ‘एसईबीसी’ जात प्रमाणपत्र कशा पद्धतीने दिले जावेत, यासाठी अध्यादेश ७ डिसेंबर रोजी जारी केला आहे.
मराठा समाजाच्या आरक्षणाचा अहवाल १८ नोव्हेंबर रोजी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत स्वीकारण्यात आला. त्यानंतर सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाने मंत्रिमंडळ उपसमिती नेमली. सदरील समितीने एसईबीसी प्रवर्गासाठी विधेयक मांडले. त्यानुसार राज्य विधान मंडळाच्या हिवाळी अधिवेशनात अधिनियम ६२ पारित करण्यात आले. या निर्णयामुळे नवीन जात प्रवर्ग घोषित करण्यात आल्याने जात प्रमाणपत्र देण्यासाठी शासनाने कार्यपद्धती आणि नमुने जारी केले आहेत. इतर जात प्रवर्गांसाठी जे नियम लागू होते, तेच नियम ‘एसईबीसी’चे प्रमाणपत्र मिळण्यासाठी लागू करण्यात आले आहेत. शासनाने जारी केलेल्या नमुन्यानुसार सेतू सुविधा केंद्रातील सॉफ्टवेअरमध्ये बदल करण्यात आला आहे. त्यामुळे एसईबीसीचे जात प्रमाणपत्र देण्यास सुरूवात होईल.
सेतूतून रोज किती प्रमाणपत्र मिळतात
सेतू सुविधा केंद्रातून दररोज १५० च्या आसपास रहिवासी प्रमाणपत्र, उत्पन्नाचे दाखले १०० ते १२०, जात प्रमाणपत्रांसाठी २५ ते ३० अर्ज येतात. राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र आणि नॉन क्रिमिलेअरसाठी ५० ते ६० अर्ज येतात. मराठा समाजाकडून ‘एसईबीसी’ प्रवर्ग जात प्रमाणपत्र काढण्यासाठी अर्ज आले काय? अशी माहिती सेतू सुविधा केंद्रातील अधिकाऱ्यांना विचारली असता ते म्हणाले, रोज दोन ते तीन अर्जदार विचारणा करीत आहेत; शासकीय पातळीवर आॅनलाईन सॉफ्टवेअर अपडेट करण्यात आले असून मंगळवारपासून अर्ज घेण्यास सुरूवात होईल, असा दावा करण्यात आला आहे.