विद्यापीठात निवडणुकीची लगबग सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2017 11:50 PM2017-10-09T23:50:30+5:302017-10-09T23:50:30+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणाच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होण्यास विलंब झाला आहे. याविषयी राज्य सरकार, राज्यपाल कार्यालयांकडे तक्रारी गेल्यामुळे निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्याची लगबग सुरू आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणाच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होण्यास विलंब झाला आहे. याविषयी राज्य सरकार, राज्यपाल कार्यालयांकडे तक्रारी गेल्यामुळे निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्याची लगबग सुरू आहे. कुलगुरूंनी निवडणूक निर्णय अधिका-यांना सर्व कामे बाजूला ठेवून हेच काम करण्याचे आदेश दिल्याचे सूत्रांनी सांगितले.
राज्य सरकारने महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा-२०१६ मंजूर केल्यानंतर ३१ आॅक्टोबरपर्यंत सर्व अधिकार मंडळांची निवडणूक प्रक्रिया पूर्ण करून १ सप्टेंबर रोजी कार्यकारी मंडळे अस्तित्वात आणण्याचे आदेश संबंधित विद्यापीठांना दिले होते. या आदेशानुसार राज्यातील इतर अकृषी विद्यापीठांनी निवडणुकींचा कार्यक्रम जाहीर केला आहे. मात्र, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने अधिसभेसाठीच्या एकाही गटातील मतदार याद्या अद्याप प्रकाशित केलेल्या नाहीत. यातच निवडणूक प्रक्रिया संपविण्याची मुदत जवळ आली आहे. यामुळे कुलगुरूंनी निवडणूक निर्णय अधिकारी असलेल्या कुलसचिवांना सर्व कामे स्थगित ठेवून केवळ निवडणुकीचे कामकाज उरकण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यामुळे आगामी दोन-तीन दिवसांत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होणार असल्याचे समजते.
संघटनांचे साकडे
विद्यापीठाच्या निवडणुकींचा कार्यक्रम जाहीर करून घेण्यासाठी बामुक्टो, मुप्टा संघटनेतर्फे कुलगुरूंना सोमवारी निवेदन देण्यात आले. इतर विद्यापीठातील निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण होत आली आहे. तरीही आपल्याकडे निवडणुकीसाठी मतदार याद्याच प्रकाशित करण्यात आलेल्या नाहीत. या याद्या तात्काळ प्रकाशित करून निवडणुका घेण्याची मागणी संघटनांच्या शिष्टमंडळाने केली. या शिष्टमंडळात बामुक्टाचे प्रा. अंकुश कदम, डॉ. फुलचंद सलामपुरे, डॉ. अप्पासाहेब हुंबे, डॉ. राजेश रगडे, मुप्टाचे प्रा. सुनील मगरे, डॉ. संभाजी वाघमारे आदींचा समावेश होता. बामुक्टा, मुप्टाच्या शिष्टमंडळाने कुलगुरूंची भेट घेतल्यानंतर विद्यापीठ विकास मंचचे डॉ. गजानन सानप यांच्या गटानेही कुलगुरूंची भेट घेतली.