राज्य कर्करोग संस्था राज्यातील हजारो रुग्णांचा आधारवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2019 11:36 AM2019-09-21T11:36:56+5:302019-09-21T11:37:28+5:30
२१ सप्टेंबर २०१२ रोजी आमखास मैदानासमोर सुरु झाले रुग्णालय
औरंगाबाद : राज्यातील हजारो कर्करुग्णांचा शब्दश: मोठा आधारवड ठरलेल्या राज्य कर्करोग संस्था अर्थात शहरातील आमखास मैदानासमोरील शासकीय विभागीय कर्करुग्णालयात गेल्या नऊ महिन्यांत ३२ हजारांवर रुग्णांची तपासणी होऊन साडेचार हजार कर्करुग्णांवर उपचार झाले आहेत. तसेच २७ हजारांपेक्षा जास्त किरणोपचार, १० हजारांवर किमोथेरपी, ८० हजारांवर सर्व प्रकारच्या तपासण्या, तर सव्वादोन हजार छोट्या-मोठ्या शस्त्रक्रिया झाल्या आहेत.
'लोकमत' चे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांच्या प्रयत्नातून व अनेक अडथळे पार करीत २१ सप्टेंबर २०१२ रोजी उद्घाटन झालेल्या कर्करुग्णालयामध्ये टप्प्याटप्प्याने सुधारणा होत गेल्या. २०१६ मध्ये कर्करुग्णालयाला राज्य कर्करोग संस्थेचा दर्जा मिळाला आणि त्याचबरोबर ‘टाटा मेमोरियल हॉस्पिटल’नेही कर्करुग्णालयाला आपले उपकेंद्र जाहीर केले. तेव्हापासून कर्करुग्णालयाने कात टाकण्यास सुरुवात केली. वेगवेगळ्या सेवा-सुविधा वाढत जाऊन ‘टाटा’तील तज्ज्ञांच्या सेवाही कर्करुग्णालयात उपलब्ध होऊ लागल्या आहेत. त्याचवेळी कर्करुग्णालयातील डॉक्टरांनाही ‘टाटा’मध्ये प्रशिक्षण मिळण्यास सुरुवात झाली.
याच सुधारणांचा भाग म्हणून ‘टाटा’कडून कर्करुग्णालयाला ‘भाभा ट्रॉन’ हे तीन कोटींचे उपकरणही देण्यात आली. तांत्रिक कारणांमध्ये वर्षभर हे उपकरण धुळखात पडून होते; परंतु मागच्या दोन वर्षात ‘भाभा ट्रॉन’मुळे ५ हजार ७६८ किरणोपचार झाल्यामुळे रुग्णांना मिळालेला आधारही स्पष्ट झाला आहे. त्याशिवाय कर्करुग्णालयातील सर्वच उपचार प्रकारांचे आकडे हजारांवर पोहोचले असून, हे आकडे वर्षागणिक वाढत असल्याचेही स्पष्ट झाले आहे.
विशेष म्हणजे अनेक वर्षे खंडित झालेला ‘एमडी-रेडिओथेरपी’ हा पदव्युत्तर अभ्यासक्रम मागच्या वर्षापासून कर्करुग्णालयात सुरू झाला असतानाच आता ‘एमसीएच-ऑन्कोसर्जरी’ हा अतिविशेषोपचार अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.