स्पर्श ग्रामीण रुग्णालयास राज्य शासनाचा पुरस्कार
By Admin | Published: July 11, 2017 05:37 PM2017-07-11T17:37:36+5:302017-07-11T17:41:57+5:30
लोहारा तालुक्यातील सास्तूर येथील स्पर्श ग्रामिण रुग्णालयाला स्वच्छ भारत अभियान अंतर्गत रुग्णालयासाठी अतिशय प्रतिष्ठेचा समजला जाणारा राज्यस्तरीय कायाकल्प द्वितीय पुरस्कार प्राप्त झाला
>ऑनलाईन लोकमत
नांदेड : लोहारा तालुक्यातील सास्तूर येथील स्पर्श ग्रामिण रुग्णालयाला स्वच्छ भारत अभियान अंतर्गत रुग्णालयासाठी दिला जाणारा राज्यस्तरीय कायाकल्प द्वितीय पुरस्कार प्राप्त झाला.
कायाकल्प या केंद्र शासनाच्या पुरस्कार योजनेमध्ये ५०० गुणांचे चार स्तरीय मूल्यमापन करण्यात येते. यात महाराष्ट्रातील सर्व आरोग्य संस्थानी यामध्ये सहभाग नोंदवला होता. यात ९५.५४ गुणांकन प्राप्त करून स्पर्श रुग्णालयाने राज्य स्तरीय द्वितीय पुरस्कार प्राप्त केला. दहा लक्ष रुपये, प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
यशवंतराव चव्हाण प्रतीष्ठाण, मंत्रालय मुंबई येथे राज्याचे आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत,अप्पर मुख्य सचिव डॉ. विजय सतबीर सिंग,राष्ट्रीय आरोग्य आयुक्त प्रदीप व्यास,अभियान आरोग्य विभागाचे संचालक डॉ. सतीश पवार यांच्या हस्ते हा पुरस्कार सोमवारी (दि. १० ) प्रदान करण्यात आला. संस्थेच्या प्रमुख इशा मेहरा, जिल्हा शल्यचीकीस्तक डॉ.एकनाथ माले ,प्रकल्प अधिकारी रमाकांत जोशी,प्रकल्प प्रमुख संगीता दास व कर्मचारी यांनी हा पुरस्कार स्वीकारला आहे.
ग्रामीण भागातील जनतेच्या आरोग्यविषयक गरजा जाणून घेऊन सास्तूर येथील स्पर्श ग्रामीण रुग्णालय महाराष्ट्र शासनाने १८ वर्ष पूर्वी आरोग्य विभागामार्फत सुरु केले. जवळपास चार जिल्ह्यामधून १९१ गावामधून रुग्णांचा ओघ सुरु असतो. सुसज्ज बाह्यरुग्ण विभाग, अंतररुग्ण विभाग, शस्त्रक्रीयागार, क्ष-किरण यंत्रणा, सुसज्ज प्रयोगशाळा , सोनोग्राफी, दंतचिकित्सक विभाग, एच.आय.व्ही. बाधितांसाठी सामाजिक देखभाल केंद्र, ए.आर.टी.केंद्र, काळजी व आधार केंद्र, विपुला माता व बालसंगोपन केंद्र, सुसज्ज प्रशिक्षण केंद्र 3 फिरत्या वैद्यकीय पथकाच्या माध्यमातून येथे नागरिकांना आरोग्य सेवा व आरोग्य शिक्षण देण्यात येते.