राज्य शासनाने शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार नुकसान भरपाई द्यावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2021 03:39 PM2021-10-04T15:39:06+5:302021-10-04T15:39:40+5:30
केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ भागवत कराड यांची नुकसानग्रस्त भागाची पाहणी
कन्नड ( औरंगाबाद ) : अतिवृष्टीने आणि सततच्या पावसाने तालुक्यातील पिकांचे १०० टक्के नुकसान झाल्याचे पाहणी दौऱ्यात दिसून आले आहे. शेतकऱ्यांना पुढील पेरणीसाठी राज्य शासनाने तातडीने हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत द्यावी अशी मागणी केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ भागवत कराड यांनी केली. ते सध्या अतिवृष्टीने नुकसान झालेल्या कन्नड येथील भागाच्या पाहणी दौऱ्यावर आहेत.
औरंगाबाद जिल्ह्याला महिनाभरात तीन वेळा अतिवृष्टीचा तडाखा बसला आहे. यामुळे शेती, पिके यांचे अतोनात नुकसान झाले आहे. हातची पिके पाण्यात गेल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. या भागाची पाहणी केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी आज सकाळी केला. यावेळी ते म्हणाले, आजही अनेक शेतांमध्ये पाणी साचलेले आहे. खरीप पूर्णपणे वाया गेले असून रब्बीच्या पेरणीसाठी शेतकऱ्यांकडे पैसा नाही. त्यासाठी शासनाने शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजार रूपयांची मदत द्यावी.
यावेळी जिल्हाध्यक्ष विजय औताडे, जिल्हा उपाध्यक्ष संजय खंबायते, संजय गव्हाणे , विजय औटे, तालुकाध्यक्ष भगवान कोल्हे ,शहर अध्यक्ष सुरेश पाटील डोळस ,जि प सदस्य किशोर पवार,शिवप्रभु ज्ञाने रमेश नागरे ,अनुसूचित जाती चे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गव्हाणे, शिवाजी बोरसे, सामाजिक कार्यकर्ते सिद्धार्थ निकाळजे ,भगवान ठाकरे, प्रदीप बोडखे, गोपीनाथ वाघ भगवान कांदे आदी होते.