राज्य शासन महिला सरपंचाना देणार प्रोत्साहनपर आदर्श पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2021 05:17 PM2021-11-08T17:17:02+5:302021-11-08T17:18:24+5:30
ग्रामविकास व महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी राज्यातील महिला सरपंचाना प्रात्साहनपर आदर्श सरपंच पुरस्कार देण्यात येणार असल्याची घोषणा केली.
औरंगाबादः राज्यातील महिला सरपंचांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासन आदर्श महिला सरपंच पुरस्कार देणार (Adarsh Mahila Sarpanch Award) असल्याची घोषणा ग्रामविकास आणि महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी आज केली. त्यांनी औरंगाबादेतील महिला सरपंच परिषदे दरम्यान पत्रकारांशी संवाद साधला.
ग्रामविकास व महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी राज्यातील महिला सरपंचाना प्रात्साहनपर आदर्श सरपंच पुरस्कार देण्यात येणार असल्याची घोषणा केली. सत्तार यांनी दिलेल्या माहितीनुसार, शासन महिला सरपंचाना राज्य आणि जिल्हा अशा दोन पातळीवर पुरस्कार देणार आहे. या आदर्श सरपंच पुरस्काराचे नाव स्व. मीनाताई ठाकरे आदर्श महिला सरपंच पुरस्कार असे असेल. पहिला पुरस्कार २५ लाख रुपये रोख रकमेचा असेल. दुसरा २० लाख रुपये रोख, तिसरा १० लाख रुपये रोख तसेच चौथा आणि पाचवा प्रत्येकी ५ लाख रोख रुपये रोख असे पुरस्काराचे स्वरूप असणार आहे. हे पुरस्कार येत्या डिसेंबर महिन्याच्या अखेरीस वितरीत करण्यात येतील अशी माहितीही सत्तार यांनी दिली.
जिल्हा परिषदेच्यावतीने आज औरंगाबादमध्ये महिला सरपंच परिषदेचे (Mahila Sarpanch Parishad) आयोजन करण्यात आले आहे. यावेळी ग्रामविकास व महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्यासह विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, उद्योगमंत्री तथा पालकमंत्री सुभाष देसाई, रोहयो मंत्री संदिपान भुमरे, महिला व बालविकासमंत्री यशोमती ठाकूर आदी उपस्थित होते.