रासायनिक खतांच्या वाढलेल्या किमतीबद्दल राज्य शासन केंद्राशी चर्चा करून तोडगा काढेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:04 AM2021-05-18T04:04:17+5:302021-05-18T04:04:17+5:30
औरंगाबाद : रासायनिक खतांच्या किमतीमध्ये वाढ झालेली आहे. याबाबत राज्य शासन केंद्र शासनाशी चर्चा करणार असून, हा प्रश्न कसा ...
औरंगाबाद : रासायनिक खतांच्या किमतीमध्ये वाढ झालेली आहे. याबाबत राज्य शासन केंद्र शासनाशी चर्चा करणार असून, हा प्रश्न कसा सोडविता येईल, याबाबत मार्ग काढला जाईल, तसेच शेतकऱ्यांना सबसिडी देता येईल का, याबाबतीतही प्रयत्न केल्या जातील, अशी ग्वाही पालकमंत्री सुभाष देसाई यांनी सोमवारी येथे दिली, तसेच ऊर्जामंत्री यांच्यासमवेत बैठक घेणार असून, शेतकऱ्यांच्या प्रलंबित कृषी पंपांच्या जोडण्या लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश प्रशासनाला दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
जिल्हास्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठक पालकमंत्री देसाई यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. यावेळी रोजगार हमी योजनामंत्री संदीपान भुमरे, महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार, जिल्हा परिषद अध्यक्षा मीना शेळके, खा.इम्तियाज जलील, आमदार हरीभाऊ बागडे, संजय सिरसाठ, सतीश चव्हाण, अंबादास दानवे, उदयसिंह राजपूत, प्रा.रमेश बोरनारे, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, पोलीस आयुक्त डॉ.निखिल गुप्ता, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मंगेश गोंदावले उपस्थित होते.
आधीच अडचणीतील असलेला शेतकरी वाढत्या खतांच्या किमतीमुळे आणखी अडचणीत येईल, असे म्हणत केंद्राने यावर तोडगा काढण्याची मागणी आमदारांनी केली. वाढत्या किमतीबद्दल आमदारांनी खत उत्पादक कंपन्यांच्या प्रतिनिधींवर प्रश्नांचा भडिमार केला, तर कंपन्यांच्या प्रतिनिधींनी कच्च्या मालाच्या वाढलेल्या किमतीमुळे खतांच्या किमती वाढल्याचे स्पष्ट केले. आ.बागडे यांनी सर्व भार केंद्रानेच उचलणे संयुक्तिक ठरणार नसून, राज्यानेही काही भार उचलण्याची सूचना केली.