सरकार मराठा, ओबीसी समाजाला गाजर दाखवत आहे; अंबादास दानवे यांचा आरोप
By बापू सोळुंके | Published: July 15, 2024 07:32 PM2024-07-15T19:32:27+5:302024-07-15T19:34:06+5:30
सरकार जेव्हा अडचणीत असते तेव्हा त्यांना विरोधी पक्ष आठवतो: अंबादास दानवे
छत्रपती संभाजीनगरः मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांना पुन्हा उपोषणाचा इशारा द्यावा लागला. हे सरकार मराठा आणि ओबीसी समाजाला गाजर दाखवत असल्याचा आरोप विधान परिषदेतील विरोधीपक्ष नेते आ. अंबादास दानवे यांनी सोमवारी येथे पत्रकार परिषदेत केला.
मराठा समाजाच्या आरक्षणाविषयी राज्यसरकारने बोलावलेल्या सर्वपक्षिय बैठकीवर महाविकास आघाडीने बहिष्कार टाकल्यामुळे तुमच्यावर टिका होत आहे, याकडे दानवे यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले की, आम्ही आधीपासून म्हणतो की, मराठा आरक्षणाविषयी सरकारने भूमिका स्पष्ट करावी. मात्र सरकार त्यांची भूमिका स्पष्ट करत नाही. सरकार जेव्हा अडचणीत असते तेव्हा त्यांना विरोधी पक्ष आठवतो, अशी टिकाही आ.दानवे यांनी केली. आमच्या पक्षप्रमुखांनी आधीच आरक्षणाची मर्यादा वाढविण्याची भूमिका स्पष्ट केली असल्याचे त्यांनी नमूद केले.
महायुतीच्या सरकारने बजेटपेक्षा दहा पट खर्चाच्या निविदा काढल्या
महायुतीचे सरकार हे टक्क्केवारीचे सरकार असल्याचा आरोप करीत आ.दानवे म्हणाले की,सार्वजनिक बांधकाम विभागासाठी केवळ १८ हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर असताना राज्य सरकारने या विभागाच्या सुमारे सव्वा लाख कोटी रुपयांच्या विकास कामाच्या निविदा काढल्या आहेत. यामुळे आर्थिक ताळमेळ नसलेले हे सरकार आहे.
विधीमंंडळात मराठवाड्याच्या विविध प्रश्नांवर आवाज उठविला
आ. दानवे म्हणाले की, काल परवा संपलेले राज्य विधीमंडळाचे अधिवेशन हे या सरकारचे शेवटचे अधिवेशन होते. विरोधी पक्षनेता म्हणून आपण मराठवाड्यासंबंधी विविध प्रश्न उपस्थित केल्याचे त्यांनी नमूद केले. शेतकरी पीक विमा, गर्भलिंग निदान चाचणीचे नुकतेच उघडकीस आलेली प्रकरणे, सातारा परिसरातील रहिवाशांना करण्यात येत असलेली गुंठेवारीची सक्ती संदर्भातही आवाज उठविल्याचे ते म्हणाले.
जगप्रसिद्ध वेरूळ लेण्या दहशतवाद्यांच्या टार्गेटवर
नुकत्याच पकडण्यात आलेल्या इसिस संबंधित अतिरेक्यांच्या टार्गेटवर जगप्रसिद्ध वारसास्थळ असलेली वेरूळची लेणी असल्याचे समोर आले आहे. असे असताना केंद्रीय पुरातत्व विभाग लेण्यांच्या सुरक्षेसंदर्भात गंभीर नसल्याचा आरेाप आ.दानवे यांनी केला. ते म्हणाले की,मागील वर्षभरात सुमारे २५ लाख पर्यटकांनी लेण्यांना भेटी दिल्या. यात विदेशी पर्यटकांची संख्याही अधिक हाेती. यामुळे अजिंठा आणि वेरूळ लेण्या, बीबी का मकबरा च्या सुरक्षेकडे लक्ष द्यावे, अशी मागणी आपण शासनाकडे केल्याचे ते म्हणाले.