राज्य नशेच्या गर्तेत, तरीही ‘टास्क फोर्स’ कागदावरच; मान्यता दिली, मात्र मनुष्यबळच नाही
By सुमित डोळे | Published: October 26, 2023 07:52 AM2023-10-26T07:52:01+5:302023-10-26T07:52:23+5:30
राज्याचा स्वतंत्र अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स दोन महिने उलटूनही अद्यापि कागदावरच आहे.
सुमित डोळे, छत्रपती संभाजीनगर : गेल्या महिन्याभरात राज्यात अब्जावधी रुपयांचे अमली पदार्थांचे रॅकेट समोर येत आहे. ड्रग्स माफियांनी नाशिक, कोल्हापूर, सोलापूरपाठाेपाठ छत्रपती संभाजीनगरमध्ये एमडी ड्रग्सचे कारखानेच उघडल्याचे निदर्शनास आले. एकीकडे राज्य नशेच्या गर्तेत जात असताना दुसरीकडे राज्याचा स्वतंत्र अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स (एएनटीएफ) दोन महिने उलटूनही अद्यापि कागदावरच आहे.
३१ ऑगस्ट रोजी गृहविभागाने या फोर्सला मान्यता देऊन रचना परिक्षेत्रनिहाय रचना करून दिली. मात्र, मनुष्यबळाअभावी त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे वरिष्ठ पोलिस सूत्रांनी सांगितले. त्याचा परिणाम कारवाईवर हाेत असल्याकडे या अधिकाऱ्यांनी लक्ष वेधले.
अशी ठरवली संरचना
एटीएस, एसीबीप्रमाणे अमली पदार्थांसाठी हा फोर्स स्वतंत्र असेल. विशेष पोलिस महानिरीक्षक दर्जाचे अधिकारी प्रमुख असतील. पुण्याच्या सीआयडी मुख्यालयात याचे मुख्यालय असेल. अमली पदार्थांच्या प्राप्त तक्रारी, माहितीवरून स्थानिक ठाण्यात गुन्हा दाखल करून फोर्सचे पथक त्याचा स्वतंत्र तपास करेल.