रक्तदानाच्या राज्यस्तरीय महायज्ञाचा आज शुभारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:04 AM2021-07-02T04:04:31+5:302021-07-02T04:04:31+5:30
औरंगाबाद : स्वातंत्र्यसेनानी तथा ‘लोकमत’चे संस्थापक संपादक श्रद्धेय जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित ‘लोकमत रक्ताचं नातं’ ...
औरंगाबाद : स्वातंत्र्यसेनानी तथा ‘लोकमत’चे संस्थापक संपादक श्रद्धेय जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित ‘लोकमत रक्ताचं नातं’ या रक्तदानाच्या राज्यस्तरीय महायज्ञाचा २ जुलै रोजी सकाळी १० वाजता लोकमत भवन येथे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते शुभारंभ होणार आहे. कोरोना प्रादुर्भावात निर्माण झालेला रक्ताचा तुटवडा दूर होण्यासाठी ‘लोकमत’ने सामाजिक बांधिलकी जोपासत या महारक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. या सत्कार्यात शहरवासीयांनी योगदान देऊन सामाजिक बांधिलकीचा आदर्श घालून द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
लोकमत भवन येथे महारक्तदान शिबिराच्या शुभारंभप्रसंगी ‘लोकमत’चे एडिटर इन चिफ राजेंद्र दर्डा, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, पोलीस आयुक्त डाॅ. निखिल गुप्ता, मनपा प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. मंगेश गोंदावले, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (घाटी) अधिष्ठाता डाॅ. कानन येळीकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. राज्यभरात कोरोना प्रादुर्भावामुळे रक्तदानाचे प्रमाण घटले आहे. परिणामी, अपघातग्रस्तांसह गरजू रुग्णांना रक्त मिळण्यासाठी भटकंती करण्याची वेळ नातेवाइकांवर ओढवत आहे. या सगळ्या परिस्थितीमुळे ‘लोकमत’ने राज्यभरात महारक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. महारक्तदान शिबिरासाठी शहरातील सर्व रक्तपेढ्या आणि त्यांचे कर्मचारी सज्ज झाले आहेत.
----
विविध सामाजिक संस्था, संघटनांचा सहभाग
महारक्तदान शिबिरात औरंगाबाद जिल्हा व्यापारी महासंघ, मसिआ, सीए संघटना, औरंगाबाद जिल्हा महसूल कर्मचारी संघटना, ॲम्ब्युलन्स हेल्प रायडर्स ग्रुप, महावितरण अधिकारी-कर्मचारी, तसेच महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटना, महाराष्ट्र एसटी कामगार सेना, शिक्षक संघटना, णमोकार एसएमएस सेवा, श्री खंडेलवाल दिगंबर जैन पंचायत यासह विविध सामाजिक संघटना, संस्थांनी महारक्तदान शिबिरात सहभाग नोंदविणार असून, औरंगाबादकरांनी रक्तदान करावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
-----
लोकमत भवनच्या पाठीमागील गेटने प्रवेश
१८ ते ६० वर्षे वयोगटातील व्यक्ती, कोविड निगेटिव्ह झाल्यानंतर २८ दिवसांनी, तसेच लसीचा पहिला डोस अथवा दुसरा डोस घेतल्यानंतर १४ दिवसांनी रक्तदान करता येते. लोकमत भवन येथे शुक्रवारी आयोजित शिबिरात रक्तदान करण्यासाठी दात्यांना लोकमत भवनच्या पाठीमागील गेटने प्रवेश करता येईल.