राज्यस्तरीय इज्तेमाला उत्साहात सुरुवात; देश-विदेशातील लाखो साथींची उपस्थिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 09:06 PM2018-02-24T21:06:13+5:302018-02-24T22:44:46+5:30
मागील अनेक महिन्यांपासून मुस्लिम बांधव चातकाप्रमाणे ज्या इज्तेमाची वाट पाहत होते त्याला आज सकाळी ‘फजर’च्या नमाजनंतर दिल्ली मरकजचे प्रमुख मौलाना साद साहब आणि मौलाना युसूफ कंधलवी यांच्या उपस्थितीत या सोहळ्याला सुरुवात झाली.
- मुजीब देवणीकर /शेख महेमूद
औरंगाबाद / वाळूज महानगर : मागील अनेक महिन्यांपासून मुस्लिम बांधव चातकाप्रमाणे ज्या इज्तेमाची वाट पाहत होते त्याला आज सकाळी ‘फजर’च्या नमाजनंतर दिल्ली मरकजचे प्रमुख मौलाना साद साहब आणि मौलाना युसूफ कंधलवी यांच्या उपस्थितीत या सोहळ्याला सुरुवात झाली. इज्तेमाच्या पहिल्याच दिवशी लाखो साथींनी हजेरी लावली. उद्या इज्तेमाच्या दुसर्या दिवशी आणखी साथी येणार आहेत.
लिंबेजळगाव येथे राज्यस्तरीय तीनदिवसीय तब्लिगी इज्तेमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. शनिवारी पहाटे ‘फजर’ची नमाज अदा झाल्यानंतर या भव्यदिव्य इज्तेमाला सुरुवात करण्यात आली. या राज्यस्तरीय इज्तेमासाठी देश-विदेशातून लाखोंच्या संख्येने मुस्लिम बांधवांचे लिंबेजळगावला आगमन होत आहे. मुंबई-पुणे, ठाणे, नाशिक, मालेगाव, सांगली, सातारा, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी, अहमदनगर, लातूर, उस्मानाबाद, जालना, सोलापूर, धुळे, परभणी, नांदेड, बीड, बुलडाणा, अकोला, सिंधुदुर्ग, औरंगाबाद आदी भागांतील, तसेच देश-विदेशातील भाविक लाखोंच्या संख्येने इज्तेमास्थळी हजर झाले आहेत. या इज्तेमाची पूर्वतयारी व इज्तेमाची ‘दावत’ देण्यासाठी राज्यभरातून निघालेल्या हजारो जमाअतच्या ‘साथी’चे इज्तेमास्थळी आगमन झाले आहे. तीन-चार दिवसांपासून शेकडो ट्रक, बसेस, जीप, कार, टेम्पो, रिक्षा, दुचाकी आदी वाहनांतून लाखोंच्या संख्येने मुस्लिम बांधव इज्तेमास्थळी पोहोचत आहेत. या इज्तेमासाठी आलेल्या मुस्लिम भाविकांसाठी संयोजकांच्या वतीने विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. इज्तेमा परिसरात चहा-नाश्ता, जेवण, शुद्ध पाणी, प्रसाधनगृह आदींची चांगली व्यवस्था ठेवण्यात आली आहे. या इज्तेमा परिसरात प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी पिण्याचे पाणी, जेवण, नाश्ता, वजूहखाने, स्वच्छतागृह, रुग्णालय, औषधी, रुग्णवाहिका, अग्निशमन बंब, तज्ज्ञ डॉक्टर्स आदींची व्यवस्था करण्यात आली असून, हजारो स्वयंसेवक इज्तेमाला येणार्या ‘साथी’ (भाविक) यांची खिदमत (सेवा) करण्यासाठी परिश्रम घेत आहेत.
अल्लाह व रसूलची शिकवण महत्त्वाची- हजरत मौलाना साद साहब फजरची नमाज झाल्यानंतर बयाण (प्रबोधन) करताना दिल्ली निजामुद्दीन मरकजचे हजरत मौलाना साद साहब म्हणाले की, इस्लाम धर्मात अल्लाह व रसूलची शिकवण अत्यंत महत्त्वाची आहे. जीवन हे क्षणभंगूर असल्यामुळे मृत्यूनंतर प्रत्येकाने केलेल्या पाप-पुण्याचा हिशेब द्यावा लागणार आहे. त्यामुळे जीवनात प्रत्येकाने सत्कार्य करण्याची गरज असून, पाच वेळा नमाज पढणे, कुरआनचे वाचन करणे, तसेच अल्लाहची भक्ती व अल्लाहचे शेवटचे प्रेषित (दूत) मोहंमद पैगंबर (सल्ल.) यांनी दाखविलेल्या मार्गानुसार जीवन जगण्याचा सल्ला मौलाना साद यांनी दिला. या प्रबोधन कार्यक्रमानंतर मौलाना युसूफ कंधलवी यांनीही उपस्थित समाज बांधवांना मार्गदर्शन अल्लाही भक्ती, मोहंमद (सल्ल.) यांचे विचार आचरणात आणण्याचा सल्ला दिला.
लाखो भाविकांच्या गर्दीने परिसर फुलला
या राज्यस्तरीय इज्तेमासाठी दररोज शेकडो वाहनांतून मोठ्या प्रमाणात मुस्लिम बांधव इज्तेमासाठी एकत्रित आले आहेत. इज्तेमाकडे येणारे रस्ते वाहनांच्या गर्दीमुळे फुलून गेले असून, ठिकठिकाणी रस्त्याच्या कडेला वाहने थांबवून स्वयंसेवक व नागरिक या भाविकांना थंडगार पाणी, खाद्यपदार्थ, थंडपेय आदींचा पाहूणचार करून त्यांचे आदरातिथ्य करताना दिसून येत आहेत. या इज्तेमास्थळी लाखो भाविकांनी गर्दी केल्यामुळे इज्तेमाचा परिसर गर्दीने फुलला. एवढा मोठा जनसमुदाय इज्तेमामुळे एकत्रित आल्याने अनेक जण भारावून गेले आहेत.